नवी दिल्ली : काँग्रेस- राष्ट्रावादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या काल बैठका झाल्या. बैठकांमध्ये काय निर्णय घेण्यात आला याविषयी मी बोलण योग्य नाही. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर सकारात्मक चर्चा झाली असून दोन दिवसात सत्तास्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाली आणि लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल असेही राऊत यांनी या वेळी सांगितले. दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले, देशाची घटना ही सेक्यूलर या संकल्पनेवरच आधारित आहे. शेतकऱ्यांना जात धर्म बघून मदत केली जात नाही. त्यांना शेतकरी म्हणूनच मदत केली जाते. देशात सगळ्या धर्मांना आपला वाटणारा कोणता राजा असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच सगळ्या जाती, धर्मांसोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला यासारख्या विचारांची बाहेरून आयात करण्याची गरज नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील जाहीरपणे सांगितले होते. 'धर्माच्या पुस्तकावर हात ठेवून शपथ घेण्याऐवजी तुम्ही संविधानावर हात ठेवून शपथ घ्या'.

राज्यसभेतील आसनव्यवस्था बदलल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. राऊत म्हणाले, पक्षातर्फे मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहणार आहे. महाराष्ट्राच्या राजकरणाचे पडसाद दिल्लीत उमटणे ठीक आहे. पण सदनात उमटणे हे अत्यंत चुकीचे आहे.

डोळे वटारण्यासारखे काही नाही

एकसुत्री कार्यक्रमावर बुधवारी आघाडीची बैठक झाली. रात्री आघाडीची बैठक लांबली होती. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवार-मोदी आणि शहा- मोदी यांच्यात काल झालेल्या भेटीवर राऊत म्हणाले, शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहे. शेतीविषयी त्यांना अधिक माहिती आहे. राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधनांशी यावर चर्चा केली तर यामध्ये आश्चर्य वाटण्यासारख नाही. तसेच अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहे. दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेणे यामध्ये डोळे वटारण्यासारख काही नाही. त्यांच्या या भेटीतून काही अर्थ काढण्याची गरज नाही.

Sanjay Raut | राज्यात दोन ते तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय होईल : संजय राऊत | ABP Majha



दरम्यान, सरकार स्थापनेसंदर्बात आमचा संपर्क फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु आहे. त्यांच्याशी आमचा संपर्क उत्तम पध्दतीने सुरु आहे. 1 डिसेंबरपूर्वी सरकार स्थापनेची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच, सोनिया गांधींना भेटण्याचे अद्याप प्रयोजन नाही, असे देखील राऊत यांनी सांगितले.