मुंबई: आज राज्यभर शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह आहे. रायगडवर या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,
शिवराज्याभिषेक सोहळा
आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने रायगडवरील कार्यक्रमाचे आयोजन खालीलप्रमाणे,
सकाळी 7 वाजता – युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते ध्वजपूजन.
सकाळी 7.30 वाजता – शाहिरी कार्यक्रम.
सकाळी 9.30 वाजता – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन.
सकाळी 9.50 वाजता – संभाजी छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत.
सकाळी 10.10 वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना अभिषेक.
सकाळी 10.20 वाजता – शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक.
सकाळी 10.30 वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन.
सकाळी 11 वाजता – शिवाजी महाराजांची पालखी जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाईल.
दुपारी 12.10 वाजता – शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन.
कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा
कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाहू महाराज यांच्या हस्ते 349 व्या राज्याभिषेक सोहळा होणार आहे. शाहू महाराजांचे पुत्र संभाजी राजे हे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत. तर त्यांचे वडील शाहू महाराज यांनी कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाल महलात शिवराज्याभिषेक, शरद पवारांची उपस्थिती
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यास शरद पवार उपस्थित रहाणार आहेत.
प्रदीप शर्मा यांची जामीनावर सुटका
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका होणार आहे. मनसुख हिरेंच्या हत्येप्रकरणी ते येरवडा कारागृहात होते. पुण्यातून सुटल्यानंतर तो मुंबईच्या घरी येणार आहे.
'सामना'च्या आवारात हाय होल्टेज ड्रामा होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेली काही दिवस मुंबईतल्या शाखांच्या भेटी घेत आहेत. आज श्रीकांत शिंदे प्रभादेवीच्या म्हणजे सामना कार्यालयाला लागून असलेल्या शाखेला भेट देणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या मुंबईतील शिवसेना शाखा संपर्क अभियानाअंतर्गत ही भेट आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेचा हा तिसरा जिल्हा दौरा आहे.
सकाळी 10 वाजता – मोपा विमानतळावर आगमन आणि रोड मार्गे सावंतवाडीत दाखल.
सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत सावंतवाडी संत गाडगेबाबा मंडई आणि इतर भूमीपूजनाचा कार्यक्रम.
सकाळी 11.30 वाजता – कुडाळ मध्ये शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश रणे, निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक उपस्थित राहणार आहेत.
पुढचे तीन दिवस हवामान विभागाचा अलर्ट
कोकण गोवा 3 दिवस मेघगर्जना, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट.
विदर्भात दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडकडाट, विदर्भात 7 आणि 8 जून उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
पुण्यात कमाल तापमानात वाढ होणार नाही.
आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात
आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मागच्या बैठकी वेळी महागाई नियंत्रणात येत असल्याने आरबीआयनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशात पुन्हा एकदा आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडमध्ये असल्याने ईएमआयमध्ये कोणतीही वाढ बघायला मिळणार नाही असे संकेत देण्यात आले आहे. सध्या रेपो रेट 6.50 टक्के आहे तर महागाई दर 5 टक्क्यांखाली आहे.