सातारा: देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते उच्च न्यायालयात टिकवलं. आताच्या राज्य सरकारच्या काळात हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात अडकलं असं मत आमदार शिवेद्रराजेंनी व्यक्त केलं. ते साताऱ्यात अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलत होते.
मराठा आरक्षणावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारुन चालणार नाही. महत्वाचं म्हणजे ते आरक्षण त्यांनी उच्च न्यायालयात टिकवलं. त्यांनी जे केलं ते आपण मान्य करणं ही काळाची गरज झाली आहे. सध्याचं सरकार आल्यानंतर हा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अडकला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारवर मराठा समाजाने दबाव निर्माण करावा आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला जी स्थगिती मिळाली आहे ती लवकरात लवकर उठवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे."
आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, "राज्य सरकारने आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करावेत यासाठी मराठा समाजाने राज्य सरकारवर दबाब आणणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयात टिकलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडली पाहिजे."
मराठा आरक्षणावर बोलताना शिवेंद्रराजे पुढे म्हणाले की, "मराठा आरक्षणात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. आरक्षणापासून मराठा समाज वंचित रहावा म्हणून जाणिवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाजानं एकत्र येण्याची गरज आहे."
Maratha Reservation | दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या : उदयनराजे
देवंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं-उदयनराजे
गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरला साताऱ्यातील एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले होते की, "सत्ता पुन्हा देवेद्र फडणवीसांच्या हाती द्या, मी आरक्षण मिळवून देतो." देवेंद्र फडणवीस मराठा नसूनही त्यांनी आरक्षण दिलं आहे असं मत व्यक्त करताना उदयनराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती.
खासदार उदयनराजे राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले होते की, "आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला जबाबदार ही सगळी राज्याच्या सत्तेत बसलेली मंडळी असतील."
संभाजीराजेंचीही या आधी टीका
डिसेंबरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला होता. मराठा आरक्षणाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असताना एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश देण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली होती. त्यामुळे मराठा आरक्षण धोक्यात येईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली होती.
एकंदरीत तीनही राजांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरलं आहे, तसेच राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. हे करतानाच त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने न्यायालयीन प्रक्रिया हाताळली त्याचंही कौतुक केलं आहे. आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उदयनराजे आणि संभाजीराजेंच्याकडे नेतृत्व द्यावं अस मत आमदार शिवेंद्रराजेंनी व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षणाचं नेतृत्व उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या हातात द्या: शिवेंद्रराजे भोसले