Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित स्वतंत्र पॅनेल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ‘वंचित बहुजन विद्यार्थी विकास आघाडी’ असे या पॅनेलचे नाव असेल.
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येक गावात कार्याकर्त्यांचे जाळे असून पदवीधरांपर्यंत पोहोचून आम्ही आमची भूमिका मांडणार असल्याचा माहिती वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. क्रांती सावंत यांनी दिली. वंचित बहुजन विकास आघाडीच्या इस्लामपुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत स्वतंत्र पॅनेल करून अधिसभा लढवण्याचा निर्णय झाला. विद्यापीठाची निवडणूक लढवण्याची सूचना ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. त्यानुसार स्वतंत्र पॅनेल करण्यात येणार आहे.
सिनेट निवडणुकीसाठी शिव शाहू आघाडी
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना, ऑल इंडिया युथ स्टुडंट फेडरेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ़ इंडिया या संघटनांचा समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठाचा सर्व कारभार हा विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या हितासाठी पारदर्शी व स्वच्छ व्हावा, हा शिव-शाहू आघाडीचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा त्यांचे वेळेवर निकाल लावणे, विद्यापीठाचा कारभार भ्रष्टाचार विरहित असणे, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधांचा विस्तार, विद्यापीठाच्या सर्व संसाधनांचा पर्याप्त वापर करणे, विद्यापीठाची स्वाययत्ता अबाधित राहणे, नविन शैक्षणिक धोरणातील सर्व सामान्य विद्यार्थी विरोधी तरतुदींना विरोध, शिक्षणाचे खासगीकरण व नफेखोरीत विरोध, विद्यार्थ्यांवरील भरमसाठ फीवाढ धोरणाला विरोध, विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा कायमस्वरूपी भरणे, महाविद्यालयांच्या एकत्रीकरणास विरोध तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेची व संविधानातील मूल्यांची जपणूक शिवाजी विद्यापीठात व्हावी या सर्व मुद्द्यावर शिव-शाहू आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या