नांदेड : नांदेड शहरातील मालेगाव रोड वरील सरपंच नगर येथे पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना गेल्या एक वर्षा पूर्वी घडली होती. या घटनेत मयत शरद कुऱ्हाडे याचा मृतदेह त्याच्या घरात आढळून आला होता. त्यावेळी मयतांच्या नातेवाईकांच्या जवाबावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय अहवाल व पोलिस तपासाअंती सदर घटना ही आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचे एक वर्षानंतर निष्पन्न झाले आहे.


मयत शरद कुऱ्हाडे हा मद्यपी होता. तो नेहमीच दारू पिऊन पत्नी आणि मुले यांना मारहाण करायचा व घरात धिंगाणा घालायचा. एवढेच नाही तर घरातील संसार उपयोगी साहित्यही दारूसाठी विक्री करायचा. त्यावर पत्नी व आई वडील बोलले तर त्यांना मारहाण करून गलिच्छ भाषेत शिवीगाळ करायचा. त्याच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून शेवटी त्याची पत्नी व मुलाने त्याचा खून केला आहे.


या घटनेत मयत शरद कुऱ्हाडे याला त्याची पत्नी अश्विनी कुऱ्हाडे, मुलगा आणि त्याच्या इतर सहा साथीदारांच्या मदतीने एक लाख रुपयांची सुपारी देऊन जीवे मारल्याचे कळतेय. त्यानुसार भाग्यनगर पोलिसात भांदवी 302 नुसार आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.