पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या धनगरवाडी, बेळगाव, कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांची बोलेरो गाडी थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहाटेच्या वेळी झोपेत हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिला, दोन पुरूष आणि एक अकरा वर्षाची मुलगी अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आता उरलेल्या 11 जखमींवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत .
हा अपघात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास कासेगाव परिसरात (सातवा मैल) घडला. जखमींना येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झाले.
याबाबतची माहिती अशी की, चंदगड( कोल्हापूर) येथील 16 भाविक बोलेरो गाडीतून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येत होते. पंढरपूर अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच कासेगावजवळ रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला पाठी मागून बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की, बोलेरोचा चेंदामेंदा झाला. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
या अपघातातील सर्व मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सखाराम धोंडिबा लांबोर ( 50 ) , शांताबाई लक्ष्मण लांबोर, पिंकी उर्फ सुनीता ज्ञानू लांबोर, नगुबाई काळू लांबोर (सर्वजण राहणार धनगरवाडी, धामणे, जिल्हा बेळगाव, कर्नाटक ) आणि तुकाराम खंडू कदम ( रा.बादराई कडवळे, ता.चंदगड, जिल्हा. कोल्हापूर ) अशी आहेत.