पुणे - पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालायातील काचेचे दरवाजे, कम्युटर, खुर्च्या यांची तोडफोड केली आहे. शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केले.


वारंवार कंपनीकडे अर्ज विनंती करुनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येत नव्हती, त्यामुळं हे तीव्र आंदोलन करण्यात आलं. विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने राज्यभरात अश्याच पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही मोरे यांनी दिलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना इशारा - 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडच्या लोहा तालुक्यातील जाणापुरी इथून उद्धव ठाकरेंच्या नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी उद्धव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरेही होते. हेक्टरी 25 हजाराच्या मदतीची मागणी उद्धव यांनी केली आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी पीकविमा आणि नुकसानभरपाई केंद्र उभारण्याचे आदेश उद्धव यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

यावेळी काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय हे माहीत आहे, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना अप्रत्यक्ष इशाराच दिला होता. याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन केल्याची चर्चा होत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 17 जुलैला शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांविरोधात धडक मोर्चा काढला होता. वांद्र्यातील बीकेसी मैदानावर हा मोर्चा धडकला होता. यावेळी त्यांनी ज्यातील खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, असा इशारा राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला होता.

संबंधित बातम्या -

काळजी करु नका विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय माहीत आहे : उद्धव ठाकरे

आमच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांना पीकविम्याचे 400 कोटी मिळाले; शिवसेनेचा दावा 

पीक विम्याच्या प्रश्नावर शिवसेना खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला