नागपूर : मागील 14 दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तेची कोंडी फुटलेली नाही. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपमधील वाद मिटण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याप्रकरणी मार्ग काढेल, असे चित्र पाहायला मिळत आहे. काल (05 ऑक्टोबर) नागपुरातील संघाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात तब्बल सव्वा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी संघ महत्त्वाची भूमिका घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

काल सरसंघचालकांची भेट घेऊन मुख्यमंत्री रात्री पुन्हा मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे संघाच्या प्रयत्नानंतर आज भाजपची शिवसेनेशी नव्याने चर्चा होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेशी सर्व प्रकारच्या चर्चेसाठी भारतीय जनता पक्ष तयार असल्याचे भाजन नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल झालेल्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मोहन भागवत यांच्यासमोर सर्व अडचणी मांडल्या. त्यानंतर भागवत यांनी याप्रकरणी संघ मध्यस्थी करेल असे, सांगितल्याचे बोलले जात आहे.

24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यावेळी राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. 288 पैकी भाजपने 105 तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. दोन्ही पक्षांनी एव्हाना सत्तास्थापन करायला हवी होती, परंतु मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु असल्यामुळे सत्तास्थापनेचं घोडं अडलं आहे.

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद तसेच सत्तेतील समसमान वाटपाच्या आपल्या मागणीबाबत शिवसेना अद्यापही ठाम आहे. परंतु शिवसेनेला गृह, महसूल आणि नगरविकास मंत्रीपदासह काही महत्त्वाची मंत्रीपदं आणि मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपाकडून स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेने अधिक आक्रमक भूमिका घेत पर्यायी सत्तास्थापनेचे संकेत दिले. परिणामी भाजपने थोडीशी मवाळ भूमिका घेत शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि काही महत्त्वाची खाती देण्याचे आश्वासन दिले. परंतु शिवसेना सत्तेतील समसमान वाटपाच्या आपल्या मागणीबाबत अद्यापही ठाम आहे.

 शिवसेनेशिवाय कसं बनणार सरकार?