पीक विम्याबाबत शिवसेना सध्या आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शिवसेनेकडून मोर्चाही काढण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पीकविम्याची रक्कम देताना कंपन्यांकडून चालढकल होत असल्याबाबत माहिती पंतप्रधानांना दिली. एकट्या महाराष्ट्रातच शेतकऱ्यांचे 473 कोटी रुपये विमा कंपन्यांनी हडपल्याचंही यावेळी खासदारांनी मोदींच्या निदर्शनास आणून दिलं. पीक विमा योजना चांगली असली तरी या संदर्भातली पूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने विमा कंपन्या त्याचा गैरफायदा घेत आहेत, असेही यावेळी खासदारांनी म्हटलं आहे.
आणेवारी करण्याची पद्धत सुधारली पाहिजे, अशी मागणीही यावेळी खासदारांनी केली. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर जिल्ह्यात विमा कंपन्यांचे अधिकारी सापडत नाहीत त्यामुळे विमा कंपनीचं ऑफिस प्रत्येक तालुक्यात असायला हवं, अशीही मागणी त्यांनी केली. शिवसेना खासदाराच्या या मागणीनंतर पंतप्रधानांनी या योजनेतील काही त्रुटी दूर करण्याबाबत आपण लक्ष घालू, असे आश्वासन दिल्याचं या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना गटनेते विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.
मुंबईतल्या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना पंधरा दिवसांची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन आता दोन दिवसात संपत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या पवित्र्यानंतर तरी विमा कंपन्या सरळ होणार की हा केवळ राजकीय स्टंट ठरणार, हे पाहणे महत्त्वाचं असेल.
पीक विम्याच्या प्रश्नावरुन शिवसेना पुन्हा आक्रमक