सिंधुदुर्ग : शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे भारत पेट्रोल पंपावर सर्वसामान्य जनतेला 100 रुपयात दोन लिटर आणि भाजपा सदस्य असलेल्याना कार्ड दाखवून 1 लिटर उपक्रमाची जाहिरातबाजी केली. शिवसेनेचा वर्धापनदिन होता, तर आजच्या आरोग्याच्या परिस्थितीत कितीतरी चांगले कार्यक्रम किंवा उपक्रम राबवता आले असते. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या हजाराचा आकडा गाठत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला उकसावत वातावरण बिघडवण्याची काहीही गरज नव्हती. पण आमदार वैभव नाईक यांनी मुद्दाम राणे यांचा पेट्रोलपंप असलेल्या ठिकाणी येऊन वातावरण बिघडवले. याठिकाणी भाजप-शिवसेना वाद निर्माण केला आणि दुर्दैवी बाब म्हणजे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना आमदार नाईक यांनी धक्काबुक्की केली.


सिंधुदुर्ग भाजपा आक्रमक झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली आहे. आमदार वैभव नाईक जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. या सगळ्याची सखोल चौकशी करून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे कटकारस्थान करणाऱ्या आणि पोलिस निरीक्षकांना धक्काबुक्की करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या विषयात भाजपा कार्यकर्त्यांना दोषी मानून त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येणार नाही.


पोलिसांनी सत्तेच्या दबावाखाली न येता योग्य पद्धतीने कारवाई करून आमदार वैभव नाईक यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत आणि आपल्या दलातील दबावाखाली आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवावे अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली. अन्यथा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखला जाण्यासाठी भाजपा सिंधुदुर्गतर्फे जिल्ह्यात उग्र आंदोलन उभारण्यात येईल असे या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक दाभाडे यांना निवेदनातुन स्पष्ट केल. या शिष्टमंडळात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, पदाधिकारी गुरुनाथ राऊळ, पप्या तवटे समावेश होता.


संबंधित बातम्या :


Shiv Sena vs BJP : तळकोकणात शिवसेनेच्या वर्धापनदिनी सेना भाजपचा राडा, शिवसैनिक आणि राणे समर्थकांत बाचाबाची