सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त कुडाळ मधील भारत प्रेट्रोल पंपवर 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल देण्यात येणार होते. तर भाजपचे सदस्य असल्याचं ओळखपत्र असल्यास ते दाखवल्यास त्यांना 1 लिटर मोफत पेट्रोल देण्यात येईल अशीही घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली होती. सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान हे पेट्रोल देण्यात येणार होत. मात्र 11 वाजता आमदार वैभव नाईक भारत पेट्रोल पंप वर आले तेव्हा त्याठिकाणी आधीपासूनच भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. भाजप कार्यकर्ते व आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले. भाजप सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्यावर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला. मात्र कुडाळ पोलिस आणि दंगल नियंत्रण दल त्याठिकाणी असल्यामुळे मोठा राडा झाला नाही.
भारत पेट्रोल पंप हा नारायण राणे यांचा असल्याचं त्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. याच भारत पेट्रोल पंपवर हा कार्यक्रम म्हणजे भाजपला डिवचण्याचे काम सेनेच्या आमदारांनी केलं आहे. कुडाळमध्ये इतर पेट्रोल पंप आहेत त्याठिकाणी का गेले नाहीत. तसेच जिल्ह्यात इतर विषय आहेत ते सोडून हाच विषय का घेतला. जर पेट्रोल वाढीसंदर्भात जनतेला दिलासा द्यायचा असल्यास राज्य सरकारने कर कमी करावा मग महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळु शकतो. जर शिवसेनेला आमच्या अंगावर यायचं असल्यास त्यांनी खुशाल यावं पण शिंगावर आल्यास अंगावर घेण्याची आमची ताकद आहे. तर सेनेची आंदोलन ही बोगस आंदोलन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सेनेच्या आमदारांसह कार्यकर्त्यांना राणेंच्या पेट्रोल पंप वरून हाकलून दिले.
शिवसेना कायमच जनतेच्या पाठिशी राहिली आहे. आज सेनेचा वर्धापनदिन असल्याने सेनेकडून आज 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिले आहे. सिंधुदुर्गात सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. अशावेळी अनेक शेतकरी ट्रॅक्टरसाठी किंवा शेतीच्या कामांसाठी बाजारपेठेत ये जा करताना पेट्रोल लागत. त्यामुळे त्यांना ते उपलब्ध केलं होतं. 2 लिटर पेट्रोलमध्ये त्यांचं काही होणार नाही. मात्र त्यांना तेवढाच दिलासा मिळाला म्हणून हे पेट्रोल उपलब्ध केलं, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सेना भाजपचा राडा सुरू झाला तेव्हा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक कोरे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी रणजित देसाई यांनी केला. त्यामुळे आमदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक हे आमदार कमी आणि गावगुंड जास्त शोभतात. बाळासाहेबांच्या शिवसेनेची संस्कृती वैभव नाईक यांना माहिती नाही. वैभव नाईक यांनी भाजपला डीवचण्याचा प्रयत्न केल्यामुळेच त्यांना चोख प्रतिउत्तर भाजप कार्यकर्त्यांनी दिले, असे भाजप पदाधिकारी रणजित देसाई म्हणाले.
आमदार वैभव नाईक यांना उधारीच पेट्रोल हवं होतं. त्यांनी याची noc न घेता उधारीच पेट्रोल मागण्यांसाठी आले होते. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना तिथून हाकलून लावला. वैभव नाईक यांना फटके पडतील म्हणून पोलिसांच्या गरड्याच्या मागून वैभव नाईक सटकला. राणे उधार पेट्रोल देतील म्हणून वैभव नाईक उधारीच पेट्रोल मागायला आला होता, अशा शेलक्या शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.