Uddhav Thackeray In Delhi: एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा होत असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमवेत तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी आज (6 ऑगस्ट) दिल्लीमध्ये पोहोचले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा रंगली आहे. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अनिल देसाई उपस्थित होते. आज उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी सुद्धा जाणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. या संदर्भात अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे.

राहुल गांधी यांच्यासोबत सुद्धा उद्धव ठाकरे यांची डिनर डिप्लोमसी 

दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासोबत सुद्धा उद्धव ठाकरे यांची डिनर डिप्लोमसी होणार आहे. संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाला सुद्धा उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजप नेते त्यावेळीच उपस्थित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालयीन भेटीदरम्यान काही धावत्या भेटी होणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. 

राज ठाकरे यांच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होणार का?

दुसरीकडे या दौऱ्यामध्ये बऱ्याच मुद्द्यांची चर्चा अपेक्षित शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीची बैठक होत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्या उद्धव ठाकरे यांची इंडिया आघाडीच्या नेत्यांसमवेत बैठक होत आहे. या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होणार का? हा सुद्धा औत्सुक्याचा मुद्दा असेल. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधांमध्ये चांगलाच गोडवा निर्माण झाला आहे. मराठी विजय दिनानिमित्त एकत्र आल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते. दोन दिवसापूर्वी बोलताना वीस वर्षांनी आम्ही दोन बंधू एकत्र आलो आहोत, तर तुम्हाला काही अडचण आहे का? अशी विचारणा करत सुद्धा पदाधिकाऱ्यांना सुद्धा आपापसातील वाद मिटवण्याचे आवाहन त्यांनी केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीमध्ये काही राज ठाकरेंच्या अनुषंगाने चर्चा होते का? याकडे सुद्धा लक्ष असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या