Eknath Shinde In Delhi: एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली दौरा केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूवाय उंचावल्या गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अधिकारांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच थेट आता त्यांची दिल्ली वारी होत असल्याने एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आज (6 ऑगस्ट) एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.
एकाच दिवसात मोदी आणि शाहांशी एकनाथ शिंदे यांची भेट
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत सुद्धा भेट होणार आहे. त्यामुळे एकाच दिवसात मोदी आणि शाह यांच्याशी एकनाथ शिंदे यांची भेट होत आहे. एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी वाढल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.शिंदे यांच्या पक्षाचे मुख्यालय दिल्लीत असल्याने ते दिल्लीत भेटीगाठीसाठी येत असावेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. दुसरीकडे राज्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारांवर सुद्धा संघर्ष पेटला असल्याची चर्चा आहे. आज एकाच दिवसात एकाच विभागासाठी एकाचवेळी दोन आदेश निघाल्याने सुद्धा सावळागोंधळ म्हणायचे की दोघांमधील संघर्षाची नांदी म्हणायची असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये असल्याने या चर्चांना आणखी ऊत आला आहे.
आमचे खासदारही गृहमंत्र्यांना भेटले
अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अधिवेशन सुरू असताना मी येत राहतो (दिल्ली दौरा) आणि आमचे खासदारही गृहमंत्र्यांना भेटले आहेत. त्यांच्या मतदारसंघांशी संबंधित काही मुद्द्यांवर चर्चा झाली. काल, एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी गृहमंत्र्यांबद्दल कौतुकास्पद भाषण केले. ते म्हणाले की अमित शाह हे गृहमंत्री आहेत ज्यांनी सर्वाधिक दिवस काम केले आहे आणि त्यांना भविष्यात आणखी काम करायचे आहे, म्हणून आम्ही त्यांचा सन्मान केला."
इतर महत्वाच्या बातम्या