Nashik Tushar Bhosale : भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची परंपरा 100 वर्ष पूर्वीची असल्याचं संजय राऊत यांनी सिद्ध करावं, असं तुषार भोसले म्हणतात. तसेच संजय राऊत हे हिंदूच नाही अशी टीका केली आहे. तर तुषार भोसले यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना आव्हान दिल आहे. 


आज सकाळी आपल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी (Sanjay Raut) धूप दाखवण्याची परंपरा 100 वर्ष जुनी असल्याचं म्हटलं होतं. यावर संजय राऊत यांनी सकल हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी तुषार भोसले म्हणाले कि, आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एक धक्कादायक खुलासा केला कि, त्र्यंबकराजाच्या मंदिरामध्ये (Trimbakeshwer Mandir) संदलची धूप दाखवण्याची शंभर वर्षाची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबक (Trimbakeshwer) नगरीमध्ये आलो, पुरोहितांशी चर्चा केली. मंदिर व्यवस्थापन मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा केली. यावरून संदलची मंदिराला धूप दाखवण्याची कोणतीही प्रथा परंपरा त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये नाही. मग संजय राऊत यांना हि परंपरा असल्याचा साक्षात्कार कधी आणि कोणी दिला, असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला. 


तुषार भोसले पुढे म्हणाले कि, आम्ही अनेक दिवसांपासून सांगत होतो की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हिंदुत्व सोडले असून संजय राऊत यांनी तर हिंदू धर्म सुद्धा सोडल्याच्या भूमिकेवर आज शिक्कामोर्तब केला असल्याचे भोसले म्हणाले. उरूस दरम्यान धूप दाखविण्याची 100 वर्ष जुनी परंपरा आहे, हे संजय राऊत यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं, असं आव्हान यावेळी भोसले यांनी दिले. अन्यथा राऊत यांनी हिंदू समाजाची माफी मागावी, हिंदू समाजाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. त्याचबरोबर या प्रकरणात एसआयटी स्थापन झालेली आहे. त्या एसआयटीने राऊत यांची चौकशी करावी, की राऊत यांच्याकडे संदल संदर्भात कोणती अधिकची माहिती आहे. अन्यथा दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे. जर 48 तासाच्या आत हिंदू धर्मीयांची माफी मागितली नाही तर 48 तासानंतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा आमचा इशारा असल्याचे भोसले म्हणाले. 


संजय राऊत आगीत तेल ओतताय....  


शंभर वर्ष जुनी धूप दाखवण्याची परंपरा असल्याचे संजय राऊत यांनी वक्तव्य केले. हे जे त्यांचं वक्तव्य आहे, हे हिंदू समाजाचा अपमान करणारे वक्तव्य आहे. मंदिराच्या प्रशासनामध्ये, स्थानिकांमध्ये अशी कोणतीही परंपरा असल्याची नोंद नसताना आणि धार्मिक वातावरण बिघडलेला असताना त्यात तेल ओतण्याचं काम संजय राऊतांनी केलं असून म्हणून त्यांनी सपशेल हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. अशा परंपरेबाबत मंदिर प्रशासनामध्ये कोणतीही नोंद नाही. पुरोहित वर्गाकडे शेकडो वर्षाचा इतिहास लिहिलेला आहे, कुठेही याची नोंद नाही. एसआयटी याची चौकशी करेल, पण दोन धर्मात तेढ निर्माण करण्यात त्यांनी हातभार लावलेला आहे. या प्रकरणांनी त्याच्यातून निश्चितच दंगली भडकू शकतात, म्हणून त्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी तुषार भोसले यांनी केले आहे.