Uddhav Thackeray vs Eknath Shinde: शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईसंदर्भात आज महत्त्वाचा दिवस आहे. दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. गेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर 30 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून (Thackeray vs Shinde) आज निवडणूक आयोगात (Election Commission) लेखी स्वरूपात काय काय मुद्दे मांडले जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी होणार नसली तरी युक्तिवाद लिखित स्वरूपात मिळाल्यानंतर पुढच्या काही दिवसात निवडणूक आयोग चिन्हबाबतचा आपला अंतिम निकाल देऊ शकतो.


23 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले होते. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद करत आहेत. 


आयोगात आत्तापर्यंत काय झालंय?



  • 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण केसच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले

  •  सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना ही सुनावणी आयोगाला करता येते की नाही याबाबत आधी निकाल द्यावा अशी विनंती केली

  •  पण केसच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ असं आयोगानं म्हटलं 

  •  त्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं वकील महेश जेठमलानी, मणिंदर सिंह यांनी युक्तिवाद पूर्ण केलेत

  •  ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले, सादिक अली केसनुसार निवडणूक आयोग हेच एकमेव अथॉरिटी आहे अशा वादावर निर्णयासाठी हे शिंदे गटानं सांगितलं

  • 20 जानेवारीला लेखी उत्तर सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश


निवडणूक आयोगातली लढाईही शिगेला पोहचली असेल. सुनावणी पूर्ण झाली तर आयोग निकाल राखून ठेवून नंतरही जाहीर करु शकतं. त्यामुळे या अंतिम निकालासाठीचा मुहूर्त नेमका कुठला असणार आणि तो सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणीआधीचाच असणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. 


दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रं आयोगासमोर सादर


शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.