30 January In History: इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. काही घटना अशा असतात की ज्याचा परिणाम देशाच्या समाजकारणावर-राजकारणावरही दीर्घकाळ राहतो. आजच्या दिवशी 30 जानेवारी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ज्याचा परिणाम देशावर झाला. महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने त्यांची हत्या केली होती. जाणून घेऊयात इतिहासातील आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या घडामोडी...


1649 :  इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स यांचा शिरच्छेद


इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला. चार्ल्स यांनी सत्तासूत्रे हाती आल्यानंतर राजघराण्याकडे सर्वाधिकार घेण्याचा प्रयत्न केला. राजा चार्ल्स आणि इंग्लिश पार्लामेंटमध्ये खटके उडू लागले होते. त्याच्या परिणामी इंग्लंडमध्ये नागरी युद्ध सुरू झाले. त्यात चार्ल्स यांचा पराभव झाला. चार्ल्स यांच्याविरोधात खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 


1882 :  फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचा जन्म


अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचा जन्म. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी चार वेळेस निवड होणारे ते एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत. 1932 मध्ये पहिल्यांदा डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ते अमेरिकेचे 32 वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वयाच्या 40 व्या वर्षी पोलिओग्रस्त झाल्यावरही ते राजकारणात सतत व्यस्त राहिले. 1929 च्या आर्थिक मंदीनंतर त्यांच्या हाती अमेरिकेची सूत्रे आली होती. त्याशिवाय, दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातही ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. 


1929 : अभिनेते रमेश देव यांचा जन्म (Actor Ramesh Dev Birth Anniversary)


हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म. रमेश देव यांनी आपल्या कारकीर्दीत 285 हून अधिक हिंदी चित्रपट, सुमारे 190 मराठी चित्रपट, जवळपास 30 मराठी नाटकांमध्ये काम केले. त्याशिवाय, मालिकांमध्येही काम केले. रमेश देव यांनी चित्रपट, माहितीपट, मालिकांचेही दिग्दर्शन केले. 


1948 : महात्मा गांधी यांची हत्या (Mahatma Gandhi Death Anniversary)


30 जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी महात्मा गांधी यांचे वय 78 वर्ष होते. दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये सायंकाळच्या प्रार्थनेला जात असताना नथुराम गोडसे याने सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर उपस्थितीत जमावाने मारेकरी नथुराम गोडसे पकडले होते. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. महात्मा गांधी यांच्या हत्येवर देशभरातच नव्हे तर जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. महात्मा गांधी यांचा स्मृतीदिन हा हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. 


इतर महत्त्वाच्या घडामोडी 


1948 :  ऑर्व्हिल राईट यांचे निधन


आपला भाऊ  विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राईट यांचे निधन झाले.


1949 : नाटकार, अभिनेते सतीश आळेकर यांचा वाढदिवस ( Actor Satish Alekar Birthday)


नाटकार, अभिनेते डॉ. सतीश आळेकर यांचा आज वाढदिवस. सतीश आळेकर यांनी रंगभूमीवर अनेक प्रयोग केले. संगीत नाटक अकादमी, पद्मश्री अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.  महानिर्वाण (1974), महापूर (1975), मिकी अॅनी मेमसाहिब (1973), बेगम बर्वे (1979) अशी त्यांची काही नाटके चांगलीच गाजली. 1984 मध्ये “ये कहानी नहीं” या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी काही जाहिरातींमध्येदेखील अभिनय केला.