Sunil raut : संजय राऊत यांच्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत. भारतीय जनता पक्ष संजय राऊत यांना घाबरत आहे, त्यामुळे ईडीला समोर करत आहे. या केसमध्ये कोणताही दम नाही. काल ईडीने माझ्या वहिनीला (वर्षा राऊत) चौकशीसाठी बोलवलं. उद्या मला बोलतील. माझ्या कुटुंबातील कोणाला ईडी चौकशीसाठी बोलवतील. मात्र आम्ही घाबरणार नाही, काहीही झाले तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही. शिवसेनेमध्येच राहणार आहोत, असे सुनील राऊत यांनी सांगितलं. कायद्यानुसार 48 तासांमध्ये आरोपीची वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे. संजय राऊत यांची तब्येत तंदुरुस्त आहे, असेही सुनील राऊत यांनी सांगितंलं.
यावेळी बोलताना सुनील राऊत यांनी केसरकरांवर आणि बंडखोर आमदारांसह मंत्रिमंडळ विस्तारावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, आता तर यांच्यातील वादाची सुरुवात आहे. दिल्लीवरून काय निकाल येतोय ते पहा. एकतर हे अपात्र होतील नाहीतर दुसऱ्या पक्षात विलीन होतील. आता हे पाहणं महत्त्वाचं राहील की किती आमदार विलीन होतात, असे सुनील राऊत म्हणाले. प्रत्येक बंडखोर आमदारांना बाळासाहेबांची हाय लागलेली आहे. प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक शिवसैनिक महिला यांच्या डोळ्यातील अश्रू यांच्यामुळेच बंडखोर आमदारांना ही सर्व हाय लागलेली आहे, असेही राऊत म्हणाले.
अजून फक्त मंत्रिमंडळ विस्तार ठरला आहे झाला नाही..? तारीख पे तारीख तारीख पे तारीख... मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, अशी टीका सुनील राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी पहिलेही कोणाला दूर केलं नव्हतं आणि आत्ताही कुणाला दूर केलं नाही. ज्यांना कुणाला पश्चाताप होत असेल त्यांनी थेट उद्धव साहेबाची संपर्क करावा, असे राऊत यांनी सांगितलं.
संदीप राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांची सर्जरी झाली आहे, त्यामुळे त्यांना नेहमी जेजे हॉस्पिटलमध्ये मेडिकल साठी ईडी अधिकारी घेवून येत आहेत, अशी माहिती संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांनी दिली. संजय राऊत भाजपविरोधी बोलतात त्यामुळे त्यांच्यावर ईडी कारवाई झाली, हे सर्वांना माहित आहे. या प्रकरणात कोणतेही तत्व नाही. वर्षा राऊत यांची ही काही काळ ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. वर्षा राऊत यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, असे संदीप राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंना आमचा सदैव पाठिंबा राहील, असेही राऊत यांनी सांगितलं.