Amruta Fadanvis : अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधील वैर नवीन नाही. मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना पायऊतार व्हावे लागल्यानंतर त्यांनी कशी नशिबाने थट्टा मांडली गाण्याचा उल्लेख करत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.


गेल्या 37 दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरुच आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आजही दिल्लीत आहेत. अमृता फडणवीस यांनी आज फ्रेंडशीप डेच्या औचित्याने  #friendshipday हॅशटॅग करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. मात्र, फोटोला दिलेल्या कॅप्शनने चांगलेच लक्ष वेधले आहे. 


त्यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले आहे. सोबत #friendshipday, #friendship, #friends, #sundayvibes, #maharashtra असे हॅशटॅग वापरले आहेत. 



दुसरीकडे छोट्या पडद्यावरील बस बाई बस (Bus Bai Bus) या कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी यावेळी अमृता फडणवीस यांना 'कशी नशिबान थट्टा आज मांडली' हे गाणं ऐकवलं. हे गाणं ऐकल्यानंतर अमृता फडणीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख केला. 


काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस? 


बस बाई बस कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांना नशिबान थट्टा मांडली हे गाणं ऐकवलं होतं. गाणं ऐकल्यानंतर कोणत्या व्यक्तीचं नाव समोर येतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हे गाणं ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले होते. 


अमृता फडणवीसांच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे चोख प्रत्युत्तर 


अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेनंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांना  गाण्यातून टोला लगावला आहे. 


किशोरी पेडणेकर म्हणतात.. 


अशी कशी नशिबान थट्टा मांडली. एक होता निर्मळ माणूस,
देवेंद्र त्याचे नाव 
मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केले हो,
एका 'अमृताची' दृष्ट त्यांना लागली 
त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले 
अशी कशी नशिबानं थट्टा मांडली...


इतर महत्त्वाच्या बातम्या