Buldhana News : बुलढाणा येथील (Buldhana News) शिवसेना शिंदे गटाचे आमदार  संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी त्यांनी केलेले वाघाची शिकार करुन त्याचा वाघनख गळ्यात लॉकेट म्हणून घातल्याचे वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा, शिवजयंतीच्या कार्यक्रमातील युवकांना केलेली मारहाण करतानाचा व्हायरल व्हिडिओ असेल, किंवा अलीकडे एका महिलेची जमीन बळकावल्या प्रकरणी त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा असेल, अशा अनेक घटनेमुळे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या आहे. आता याबाबत त्यांनी स्व:ता आपले परखड मत व्यक्त करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.  


.... म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडली 


सध्या सोशल मिडियावर आमदार संजय गायकवाड यांचा एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड हे युवकांना मारत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी स्वत: आमदार गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, शिवाजी महाराज जयंती, संभाजी महाराज जयंती, किंवा बाबासाहेब आंबेडकर जयंती सारख्या कार्यक्रमांमध्ये काही गांजा अथवा तशा प्रकराची नशा करणारी टोळी सक्रिय आहे. या तरूणांनी मिरवणुकीत घुसून काही महिला आणि मुलीवर हल्ला करत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला आम्ही चोप दिला. शिवरायांच्या मिरवणुकीत आम्ही महिलांना बोलावले होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आमची होती. असे प्रकार होत असताना आम्ही आमची जबाबदारी पार पाडली असल्याचे संजय गायकवाड म्हणाले.


पुढे ते म्हणाले, त्या वायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रश्न उपस्थित करत हे काम पोलिसांचे असल्याचे म्हटले आहे. मात्र पोलिसांनी त्यांचे काम केले असते, तर शहरात गांजा आला असता का, अपराध झाले असते का, चोरी झाली असती का, असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केला. आपण केलेल्या कृत्याचे आपल्याला जरा देखील पश्चाताप नसल्याचे देखील गायकवाड म्हणाले. 


'ते' वक्तव्य हे गांभीर्याने केलेले नव्हतं


वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात लॉकेट म्हणून घातल्या प्रकरणी अडचणीत आलेल्या आमदार गायकवाड यांनी त्यावर भाष्य करतांना हे प्रकरण पूर्णपणे मिटले असल्याचे म्हणाले आहे. वन विभागाच्या प्राथमिक अहवालामध्ये दात सिल करून प्रयोगशाळेत पाठवला असता, त्यातील प्राथमिक अहवालात काहीही तथ्य आढळले नाही. शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपण छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषा केली होती. त्यामुळे त्याठिकाणी केलेलं वक्तव्य हे गांभीर्याने केलेले नव्हतं, ते तात्पुरते  बोलतांना केलेले वक्तव्य होते. मात्र तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्याची दखल वनविभागाने घेतली. मात्र त्यात त्यांना काहीही आढळून आले नसल्याने हे प्रकरण मिटल्याचे आमदार गायकवाड म्हणाले.


कुठलीही जमीन बळकावली नाही


एका महिलेची शेतजमीन हडपून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून संजय गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोराखेडी पोलिसांनी मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बुधवारी, 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आमदार गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले,  मी कुठलीही जमीन बळकावली नाही. आमच्याकडे त्या जमीन खरेदीबाबतचे सर्व कागदपत्र आणि पुरावे आहेत. हा गुन्हा खारीज करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात देखील धाव घेणार असल्याचे आमदार गायकवाड म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या 


Buldhana News: वाघाची शिकार अन् 'त्या' वक्तव्यामुळे शिंदे गटाचे आमदार अडचणीत? वन विभागाच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष