Maval Lok Sabha constituency : महायुतीकडून पुण्यातील लोकसभा मतदारसंघातीत वाद सुरुच असल्याचे चित्र आहे. शिरुरच्या जागेवरून रामायण सुरु असतानाच आता मावळ जागेवरून (Maval Lok Sabha constituency) शिंदे गट आणि अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंना विरोध केला आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंना भाजपमध्ये घेऊन, कमळाच्या चिन्हावर उमेदवारी दिल्यास माझा विरोध कायम असेल, अशी ठाम भूमिका मावळमधील अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी घेतली आहे. 


श्रीरंग बारणेंविरोधात अहवाल तयार


कमळाच्या चिन्हावर बारणे उमेदवार असतील, तर आमची हरकत नसेल, असं भाजपचे पदाधिकारी म्हणाले होते, पण मावळ लोकसभेतून बारणेंना उमेदवारी का देऊ नये हे सुचविणारा एक अहवालच शेळके यांनी तयार केला आहे. तो अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्यात आला आहे. त्याचाच दाखला देत, मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी यावर आमदार शेळके ठाम आहेत.  


काय म्हणाले सुनील शेळके?  


अहवालावर आमदार सुनील शेळके म्हणाले की, प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारीने माझ्या नेत्याकडे जे काय माझं मत आहे, माझ्या तालुक्यातील जनतेची भावना आहे ती मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिंपरी चिंचवड शहर, मावळ, कर्जत असेल किंवा पनवेल या भागांमध्ये देखील एक चांगली ताकद आहे. तालुक्यातील जनतेची भावना मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक नगरसेवक आणि तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार हे देखील राष्ट्रवादीसोबत आहेत. मावळमधील तीच परिस्थिती आहे. कर्जतची देखील त्याच पद्धतीने परिस्थिती आहे. 


मी युतीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे. पक्षाकडून जो निर्णय दिला जाईल, तो मला स्वीकारून काम करावं लागणार आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजित दादांकडे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आली पाहिजे, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत कधीही मावळ तालुक्याला लोकसभेची संधी मिळाली नाही. आम्हाला फक्त होय म्हणावं, आमचा उमेदवार तयार असल्याचे शेळके म्हणाले. तो उमेदवार मावळ तालुक्यातून दीड लाख मतांची आघाडी घेऊन पुढे जाईल अशा पद्धतीचा उमेदवार आमची तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.   


इतर महत्वाच्या बातम्या