मुंबई राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे सूचक वक्तव्य केले. भरत गोगावले यांनी काहीशा दुरावलेल्या मंत्रिपदाच्या मुद्यावर भाष्य करताना स्वत: मुळेच ही अडचण झाली असल्याचे मान्य केले. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन होत असताना 9 मंत्रीपदे होती आणि त्यासाठी 11 जण दावेदार होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सांगण्यावरून आपण थांबलो त्यानंतर वेटिंगवर असल्याचे गोगावले यांनी सांगितले. भरत गोगावले म्हणतात राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पुन्हा का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) भरत गोगावले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले


बाळासाहेबांच्या छत्रछायेतले शिवसैनिक अशी भरत गोगावले यांची ओळख आहे . शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसची पकड असलेल्या रायगडच्या पट्ट्यात शिवसेना पक्ष रुजविण्यात आणि वाढवण्यात भरत गोगावले यांचा मोठा वाटा आहे. कोकणातल्या ग्रामीण भागातला शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भरत गोगावलेंनी राजकारणात सरपंच ते आमदार असा प्रवास करुन रायगडच्या राजकारणात आपले पाय रोवलेत. शिवसेनेतील बंडाळीनंतर भरत गोगावले राज्यभरात चर्चेत आहेत. त्यांना सतत हुलकावणी देणाऱ्या मंत्रिपद आणि पालकमंत्रिपदामुळे गोगावले हे चर्चेत असतात. खरंतर शिवसेनेतल्या बंडानंतर प्रतोदपदाची मोठी जबाबदारी त्यांना मिळाली पण त्यांच्या पुढच्या राजकीय स्वप्नात कोण खोडा घालतंय? सत्तेतल्या नव्या भिडुला सांभाळून घेण्याच्या कसरतीत शिंदे गटाच्या आमदारांकडे दुर्लक्ष होतंय का? ज्यांच्या विरोधात आजवर गोगावलेनी राजकारण केलं त्या राष्ट्रवादी सोबत ते जिल्ह्यात आणि राज्यात कसं जुळवून घेतायेत? राज्यातलं राजकारण आणखी कोणतं धक्कादायक वळण घेण्याच्या बेतात आहे का? याबाबत त्यांनी 'माझा कट्टा'वर दिलखुलासपणे संवाद साधला.


मंत्रिपदाचं काय?


भरत गोगावले यांनी म्हटले की, आम्हीच अडचण करून घेतली असल्याचे म्हटले. पहिल्या यादीत माझे नाव होते. त्यावेळी 9 मंत्री पदे आणि 11 जण होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून थांबलो ते आतापर्यंत थांबलो, असल्याचे गोगावले यांनी सांगितले. आता, मंत्रीपद दिलं तरी आनंद वाटेल आणि नाही दिलं तरी आनंद वाटेल असेही गोगावले यांनी यावेळी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही त्रास होऊ नये, अशी माझी भूमिका असल्याचे गोगावले यांनी सांगितले. 


पालकमंत्री पदाचे काय?


रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेकडे असावं अशी माझी भूमिका आहे. त्यानुसार आता आमच्या पक्षाकडे पालकमंत्री पद आहे. रायगडमध्ये आमचे शिवसेना-भाजपचे सहा आमदार आहेत. आता, सातवी आमदार राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आहेत. मात्र, पालकमंत्री पदाबाबत आधीच आम्ही वचन घेतलं आहे. त्यामुळे ते शिवसेनेकडेच राहणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. 


राष्ट्रवादीसोबत युती का?


ज्या राष्ट्रवादीला विरोध केला. त्याच राष्ट्रवादीसोबत सत्ता चालवावी लागत असल्याच्या मुद्दावर भाष्य करताना गोगावले यांनी म्हटले की, आगामी राजकारणासाठी काही डाव टाकले आहेत.  त्यासाठी राष्ट्रवादीसोबत आली आहे. ही बाब आम्हाला माहित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्याने काही अडचण नाही, असेही भरत गोगावले यांनी म्हटले. 


उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार का? 


उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिंदे गटातील काही आमदार पुन्हा जाणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का, याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, आज, सध्या तरी काही सांगू शकत नाही...राजकारणात काही घडू शकते...बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांवर टीका करायचे. मात्र, त्यानंतर काय चित्र दिसून आले हे लक्षात घ्यावं लागेल. राजकारणात कोणीही कायम शत्रू नसतो असेही गोगावले यांनी म्हटले.