Gadchiroli News: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात हत्तीच्या (elephants) कळपांनी हैदोस घातला आहे. हे हत्तीचे कळप मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. देसाईगंज तालुक्यापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या हलबी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांची जंगली हत्तीच्या कळपानं मोठी नासाडी केलीय. उभ्या पिकात हत्तींनी उत्पात मांडलाय.
तुटपुंजी आर्थिक मदत, शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने
हत्तींनी पिकांचं नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना अत्यल्प तुटपुंजी आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता एकूणच झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात किमान 50 हजार रुपये प्रती एकर आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, अन्यथा संपुर्ण कुटुंबासह सामुहिक देहत्याग करण्याचा इशारा हलबी पिंपळगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. देसाईगंज तहसीलदारामार्फत शासन, प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
जगायचे कसे? शेतकऱ्यांचा प्रश्न
दरम्यान, तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, 22 सप्टेंबर 2023 पासून जवळ जवळ 8 ते 10 दिवस जंगली हत्तीच्या कळपाचा हलबी पिंपळगाव शेतशिवार परिसरात उत्पात सुरु होता. जंगली हत्तींना पिटाळून लावण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने जीव धोक्यात घालून शर्थिचे प्रयत्न सुरु होते. मात्र, तरीही जंगली हत्तींनी जवळजवळ पिक तयार झाले असताना उभ्या पिकात उत्पात मांडून तोंडघशी आलेले पिक नेस्तनाबूत करुन टाकले आहे. लागवडीचा खर्च जवळपास 25 हजार रुपये प्रती एकर असला तरी शासकीय स्तरावरुन तुटपुंजे आणि अल्प मदत देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. ते देखील कधी मिळेल याची देखील शाश्वती नसल्यानं शेतकऱ्यांनी जगायचे कसे? कशाच्या भरोशावर पोट भरायचे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
नुकसानीच्या प्रमाणात एकरी किमान 50 हजार रुपये मदत द्यावी
प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असल्याने यातून तूर्तास सावरणे शक्य नसल्यानं शासनाने झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात किमान 50 हजार रुपये प्रती एकर आर्थिक मदत जाहीर करावी. दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी. अन्यथा, विरोधात संपुर्ण कुटुंबासह सामुहिक देहत्याग करण्यावाचून पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळं यावर आता शासन स्तरावर काय निर्णय घेतला जातो याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: