Girish Kuber : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमधील साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. या प्रकाराचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध नोंदवला आहे. साहित्य संमेलनात अशाप्रकारचं कृत्य करणं चुकीचं आहे. पुराव्यासह चुका दाखवायला हव्यात. शिवाय समोरासमोर चर्चा करायला हवी, अशाप्रकारे शाईफेक करणं चुकीचं आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "या सर्व घटनेचा मी निषेध करतो. गिरीश कुबेर जेष्ठ पत्रकार, संपादक आहेत. लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्राचे ते संपादक आहेत. त्यांनी काही लिखान केलं असेल किंवा करत आहेत, त्याबाबत मतभेद असू शकतात. गेल्या काही काळात हा वाद झाला होता. तो मी वाचलाय. मुळात त्यांनी काय लिहिलंय? हे किती लोकांनी वाचलंय? न वाचता त्यांच्यावर अशाप्रकारे शाईफेक करणं, तेही मराठी साहित्य संमेलन सुरु असताना. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशाप्रकारंच कृत्य करणं हे कुणालाही मान्य होणार नाही. त्यांनी पुस्तकात जे काही लिहिलंय त्याबाबत लोकांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यासंदर्भात कायदेशीर कारवाई होईल. पण साहित्य संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सर्वात मोठं व्यासपीठ असते. तिकडे येऊन तुम्ही शाईफेक करताय, त्यांना धक्काबुक्की करताय. सावरकर, कुसमाग्रज यांच्या भूमित असं करुन तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला तुम्ही डागाळलेय, असे संजय राऊत म्हणाले. ज्यांना कुबेरांचं लिखान पसंत नाही, त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा करावी, पुरावे द्यावे. पण अशाप्रकारे शाईफेक करणं चुकीचं आहे, असंही राऊत म्हणाले.
संभाजी ब्रिगेडनं काय म्हटलेय?-
गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले.
नेमका वाद काय आहे?-
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.
वाद आणि नाशिकचं साहित्य संमेलन -
साहित्यिकांसाठी पर्वणी असलेल्या साहित्य संमेलनाची प्रतीक्षा वाचक, रसिकांनाही तितकीच असते. मात्र साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. यंदा नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतदेखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगलं. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचं स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.मात्र फडणवीस यांनी संमेलनास येण्यास नकार दिला. त्याआधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्यानं मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशारानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला.