Shiv Sena MP Sanjay Raut PC : भाजपनं (BJP) उभे केलेले उमेदवार हे भाजपच्या मुशीत घडलेले नाहीत, तर ते बाहेरचे आहेत, अशांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे हेच पुढची 25 वर्ष मुख्यमंत्री असतील. सोनिया गांधी (Sonia Gandhi), शरद पवार (Sharad Pawar), सुप्रीया सुळे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर खूश आहेत, असंही शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे."
"राज्यसभेसाठी ज्यांनी आता सातवी जागा भरलेली आहे. त्यांना या राज्यात घोडेबाजार करायचा आहे असं दिसत आहे. त्यांच्याकडे तेवढी मतं नाहीत, मतं असती तर त्यांनी नक्की संभाजीराजेंना उमेदवारी दिली असती. पण भाजपनं आधी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा, सहाव्या जागेसाठी उभं करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर वाऱ्यावर सोडलं. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे. पण हा त्यांचा प्रश्न आहे.", असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "मला आश्चर्य वाटतंय दोन्ही उमेदवार आहेत राज्यसभेचे ते भाजपचे नाहीत, तर ते बाहेरचे आहेत. भाजपचे निष्ठावान आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचं मी वाचलं. जे इतर पक्षातून आलेले आहेत, जे शरद पवार, महाविकास आघाडीवर चिखलफेक करतात, अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्या पक्षातच नाराजी आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :