Sanjay Raut : कोण किती जागा लढणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे. आम्ही जिंकलेल्या 18 जागांवर चर्चा करायची नाही, हे आधीच ठरलेलं आहे.   जिथे काँग्रेसची ताकद तिथे काँग्रेस निवडणूक लढवेल. त्यांची मदत घेऊ. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला दिल्लीमध्ये ठरणार आहे. उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरु आहे. उद्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. आमच्यात चर्चा सुरु आहे. मतभेद असण्याचं कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले. संजय निरुपम कोण आहेत?  काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु असाही टोला राऊतांनी यावेळी निरुपम यांना दिला. 


जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, असे आधीच ठरल्याचं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे शिवसेनेला 18 लोकसभेच्या जागा मिळणार.. हे जवळपास निश्चित आहे. शिवसेना त्याशिवाय आणखी पाच जागा वाढवून मागत आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे अथवा वचिंतसाठी त्या जागा असू शकतात, असा अंदाज वर्तवला जातोय. 


राहुल गांधींमध्ये पंतप्रधानपदाचे सर्व गुण 


राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी लागणारे सर्व गुण राहुल गांधी यांच्यामध्ये आहेत. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतात, असे संजय राऊत म्हणाले. राम मदिंर उदघाटन सोहळ्याच्या निमंत्रणाची वाट पाहत नाही. राम मंदिर सोहळा हा भाजपचा कार्यक्रम असल्याचेही राऊत म्हणाले.  


दिल्लीत हायकमांडसोबत पहिली बैठक


संजय राऊत म्हणतात ते खरं आहे. लोकसभा जागावाटपाची अंतिम चर्चा ही हायकमांडसोबतच होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.  आज दिल्लीत हायकमांडसोबत पहिली बैठक आहे. सगळ्याचं ऐकून घेतलं जाईल. आम्ही आमची बाजू मांडू. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आहेच. इतर कुणाला सोबत घ्यायचे यासंदर्भात चर्चा करू. किती जागा हव्या त्याबद्दल मी बोलणार नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत जे ठरेल त्यावरच अंमल करू, असे वडेट्टीवार म्हणाले.


संजय निरुपम काय म्हणाले होते ?


संजय राऊत 23 जागांची लिस्ट घेऊन आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर एवढ्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय. वंचित बहुजन आघाडीने बारा जागांचे प्रपोजल दिलं आहे, अशा पद्धतीची बातमी मीडियामध्ये पाहिली. एवढ्या जागा ते घेणार असतील तर बाकीच्यांना काय करावे? हा माझा प्रश्न आहे? इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात, मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या, असे संजय निरुपम म्हणाले होते.