29 December In History : काँग्रेसच्या इतिहासात आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. आजच्याच दिवशी 1984 साली काँग्रेसने लोकसभेच्या 401 जागा जिंकून सर्वात मोठा विजय मिळवला. राजीव गांधींच्य नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. त्याच्या आधी दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. 


1530: हुमायून मुघल साम्राज्याचा बादशाह  (Humayun)


बाबरच्या चार मुलांपैकी हुमायून सर्वात मोठा होता (हुमायुन, कामरान, अस्करी आणि हिंदल). हुमायूनचा जन्म 1508 मध्ये काबूल येथे झाला. त्याने बाबरला अनेक युद्धांमध्ये मदत केली होती. बाबरच्या मृत्यूनंतर 1530 मध्ये हुमायून बादशाह झाला.


1844: भारतीय  कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म  


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांची आज जयंती आहे. व्योमेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 रोजी बंगालमध्ये झाला. व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी 1865 मध्ये दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेल्या लंडन इंडियन सोसायटीचे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारला. 1885 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात व्योमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बनले. 


1930: मोहम्मद इकबाल यांचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत (Muhammad Iqbal)


मोहम्मद इकबाल उर्फ अल्लामा इक्बाल हे उर्दू भाषेतील नामवंत कवी होते. तसेच भारत व पाकिस्तान मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. आजच्याच दिवशी त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांताच्या माध्यमातून पाकिस्तानच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला


1900: दिनानाथ मंगेशकर यांची जन्म (Deenanath Mangeshkar)


दीनानाथ गणेश मंगेशकर (Deenanath Mangeshkar) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. ते सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar), आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचे वडील होते. आज त्यांची जयंती आहे. गोव्यात त्यांचा जन्म झाला. 1914 मध्ये बालगंधर्वांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. 1915 मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. त्यांनी अनेक ताकातून काम केलं होत. दीनानाथ मंगेशकर यांचे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी 24 एप्रिल 1942 रोजी पुण्यात बुधवार पेठेत असलेल्या कस्तुरे वाड्यात निधन झाले.


1917: निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्मदिन (Ramanand Sagar)


रामायण आणि महाभारत सारखे ऐतिहासिक शो तयार करणारे दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचा आज जन्मदिन आहे. रामानंद सागर यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 ला लाहोर येथे झाला. जन्माच्या वेळी त्यांचे नाव चंद्रमौली चोप्रा होते. त्यांचे आजोबा पेशावरहून आले आणि कुटुंबासह काश्मीरमध्ये स्थायिक झाले. रामानंद सागर 5 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. रामानंद सागर यांना त्यांच्या मामाने अगदी लहान वयातच दत्तक घेतले होते. येथे त्यांचे नाव चंद्रमौलीवरून बदलून रामानंद सागर असे करण्यात आले.


क्लॅपर बॉय म्हणून त्याने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी पृथ्वी थिएटर्समध्ये सहाय्यक स्टेज मॅनेजर म्हणून काम केले. राज कपूरच्या बरसात या चित्रपटाची कथा आणि पटकथा रामानंद सागर यांनी लिहिली होती. 1968 मध्ये आँखे चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 1987 मध्ये चित्रपटांव्यतिरिक्त रामानंद यांनी रामायणाची निर्मिती केली. 


1942: सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म (Rajesh Khanna Birthday Anniversary)


भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म आजच्याच दिवसाचा. राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसर येथे झाला. ते काकांच्या नावानेही प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आनंद, अमर प्रेम, आराधना, कटी पतंग, 'सफर' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये आलेल्या आखरी खत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. भारतातून पहिल्यांदाच ऑस्करसाठी गेलेला हा चित्रपट त्यावेळी फ्लॉप ठरला होता.


राजेश खन्ना हे 1970 ते 1987 पर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. राजेश खन्ना हे त्यांचे बदलले नाव आहे. काकांच्या सांगण्यावरून जतिन खन्ना यांनी आपले नाव बदलून राजेश खन्ना ठेवले. राजेश खन्ना यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते. तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत राजेश खन्ना यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. एकाच वेळी 15 हिट चित्रपट देण्याचा विक्रमही राजेश खन्नाच्या नावावर आहे. आजही हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. 


1974: अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा जन्म (Twinkle Khanna Birthday)


बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna Birthday) हिचा आज वाढदिवस आहे. ट्विंकलचा 29 डिसेंबर रोजी जन्म झाला आणि ट्विंकलने बरसात या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर ती जान, जुल्मी, बादशाह, इंटरनॅशनल खिलाडी अशा अनेक चित्रपटात दिसली पण तिला यश मिळू शकले नाही. चित्रपटांमध्ये अपयशी ठरल्यानंतर ट्विंकलने बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबत लग्न केले आणि आता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना बॉलिवूडचे परफेक्ट कपल म्हटले जाते. 


1971: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांची पुण्यतिथी 


भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. गायकवाड हे आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते. तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.


1984: काँग्रेसचा इतिहासातील सर्वात मोठा विजय 


1984 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजेच 29 डिसेंबरला काँग्रेसने (Congress) लोकसभेच्या 508 पैकी 401 जागा जिंकून विक्रम केला होता. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्द्यावर काँग्रेसने ही निवडणूक लढवली होती. पण इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसला सर्वात मोठा विजय मिळाला हे स्पष्ट होतं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली होती आणि दोन महिन्यांनी निवडणुका झाल्या तेव्हा देशातील जनतेने काँग्रेसला भरभरून मतदान केले. त्यावेळी पक्षाचे नेतृत्व राजीव गांधी (Rajiv Gandhi) हे करत होते.