मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना तुम्ही अत्यंत नामर्दपणे टिका करत होतात. या नामर्दपणाला मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री स्वतः शिवाजी पार्क येथे आले होते. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाची वक्तव्ये करणाऱ्यांना चपराक बसली असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांच्या अंतर्गत किती घाण आणि कचरा आहे हे स्पष्ट झाले आहे, असे म्हणत राऊत यांनी विरोधकांवर निशाणा लगावला. मी वारंवार सांगत होतो की मुख्यमंत्री येणार आहेत. आजारपण कोणवर येईल सांगता येत नाही. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा अशा गंभीर दुखण्यातून जात होते तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेत होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. मुख्यमंत्र्याचे दर्शन झाल्याने राज्याची जनता उत्साहात आणि आनंदात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
आज देशात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच अशा पद्म पुरस्काराची (Padma Awards 2022) घोषणा करण्यात आली. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पण, याची माहिती कळताच भट्टाचार्य यांनी पुरस्कार नाकारला आहे. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. पद्म पुरस्कार नाकारणे हे चुकीचे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तसेच अनेक पुरस्कार हे मरणोत्तर दिले आहेत. हे पुरस्कार जीवंतपणी दिले जावेत. जीवंत असताना का पुरस्कार दिले नाहीत. मरणोत्तर पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी असेही राऊत यावेळी म्हणाले. यावेळी सावरकरांना भारतरत्न देतील असे वाटले होते, अद्याप त्यांना पुरसकार दिला नसल्याचे यावेळी राऊत म्हणाले.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने ट्वीट केले नाही. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या सरकारने ऐवढे पुरस्कार दिले, तुमच्या सरकारला असे का वाटले नाही की, बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण पुरस्कार द्यावा. गांधी परिवाराने ट्वीट केले नाही ही तुमची वेदना आहे तर मग बाळासाहेब ठाकरे यांना तुमच्या सरकारने पुरस्कार का दिला नाही असे वक्तव्य राऊत यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या: