Devendra Fadnavis :  भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन फाइल्स तपासत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात गदारोळ झाला होता. या प्रकरणी प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला आणि किरिट सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शासकीय कार्यालय कोणाच्या बापाचे नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमय्या प्रकरणांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस म्हणाले की, या सरकारचे डोके फिरले आहे. माहिती अधिकारात अण्णा हजारेंच्या प्रयत्नांनी नागरिकांना हे अधिकार मिळाले आहेत. शासकीय कार्यालय कोणाच्या बापाचे नाही, मी जाणीवपूर्वक एवढे कठोर शब्द वापरत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. किरिट सोमय्या यांचा फोटो कोणी काढला, हे तेथील सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. सोमय्या यांचा फोटो काढणारेच तक्रार करणारे झाले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. 


काँग्रेसची फडणवीस यांच्यावर टीका 


काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आपल्या कार्यकाळात RTI तून माहिती मिळवण्यासाठी माहिती आयुक्तांपर्यत जावे लागत होते, असा टोला सावंत यांनी लगावला. सध्या सरकारच्या कार्यकाळात आता अर्ज करुन राजरोसपणे नस्ती पाहता येते. मात्र, मंत्रीमंडळ टिप्पणी शासनाने न देता सोमय्यांना कशी मिळाली?  असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला. 


 






महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एका फोटोवरून वाद सुरु झाला आहे. किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासल्याचा कथित फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी सोमय्यांवर कारवाईची मागणी केली. तर, ठाकरे सरकारने या प्रकरणी हवी ती चौकशी करावी एसआयटी नेमावी आम्ही कोणाला घाबरत नाही.  घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान किरिट सोमय्या यांनी दिले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: