Republic Day 2022 LIVE Updates : प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! आज देशाचा 73वा प्रजासत्ताक दिन, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
Republic Day 2022 LIVE Updates : आज देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर घडणार भारतीय संस्कृती आणि संरक्षण सामर्थ्याचं दर्शन... एक हजार ड्रोन्स आणि राफेलसह 75 लढाऊ विमानांच्या कसरती...
आजच्या प्रजासत्ताक दिनाचं सर्वात मोठं आकर्षण राहिलं ते समारोपाला पार पडलेला फ्लायपास्ट. भारतीय वायूदलाच्या 75 लढाऊ विमानांनी नेत्रदीपक कसरती करत उपस्थितांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. या फ्लायपास्टची सुरुवात हेलिकॉप्टर्सच्या कसरतींनी झाली. सुरुवातीला सारंग हेलिकॉप्टर्सनी शिस्तबद्ध हवाई संचलन करत आकाशात तिरंगा ध्वज तयार केला. त्यानंतर एएलएच, अपाचे , चिनूक, एमआय-17 आणि एमआय 35 या हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक कसरती केल्या. त्यानंतर 1971च्या युद्धाच्या आठवणी जागवण्यासाठी भरारी घेतली ती डकोटा विमानांनी. या व्हिटेज विमानांचं 1971 च्या युद्धात मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर तीन हरक्यूलिस विमानांनी उपस्थितांना श्वास रोखायला लावला. त्यानंतर सूपरसॉनिक वेगात आलेल्या सुखोई, मिग, राफेल, जग्वॉर या विमानांनी वेगवेगळे फॉर्मेशन्स करत उपस्थितांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. या फ्लाय पास्टची सांगता जॉग्वॉर विमानांच्या कसरतींनी पार पडली. बालाकोट उध्वस्त करणाऱ्या जॅग्वॉर विमानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आकाशात 75 चा आकडा तयार करून अनोखी सलामी दिली.
जालना येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस कवायत ग्राउंडवर हा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थित होते. यावेळी आरोग्य मंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस दलात अतुलनीय कार्य करणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह राजपथाकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात होणार संचलनाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजपथावर आगमन झालं आहे. पंतप्रधानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
बुलढाणा : 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण समारंभ आज बुलढाणा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडला.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल परिसरातील मुख्यालयात थोड्याच वेळात होणार ध्वजारोहण. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया करणार ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील अलंकापुरीमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळतंय. संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर तर अक्षरशः उजळून निघाले आहे. मंदिर परिसर आणि मुख्य गाभारा तिरंगी फुलांनी नटविण्यात आलाय. ही सजावट भाविकांना आकर्षित करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. मुंबईत शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन बैठका घेतल्या होत्या. पण आज ते प्रथमच जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आज दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. दिल्लीत तब्बल 27 हजार जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तब्बल 71 डिसीपी, 213 एसीपी आणि 753 पोलीस निरीक्षक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत.
राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथही दिसणार आहे. महाराष्ट्राची जैवविविधता या चित्ररथातून देशासमोर येणार आहे. त्यातून राज्याच्या पर्यटनाची झलकही दिसणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरालाही आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी झेंडू, शेवंती आणि कामिनी या फुलांचा वापर करण्यात आलाय... यासोबत देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावरही तिरंगी उपरणं घालण्यात आलं आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी ही फुल सजावटीची सेवा विठोबाच्या चरणी अर्पण केली आहे.
सकाळी साडे दहा वाजता राजपथावर संचलन सुरु होणार आहे. या निमित्तानं भारताची संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन घडणार आहे. आजच्या राजपथ संचलन सोहळ्यात 1000 ड्रोन्स, 75 लढाऊ विमानं आणि 12 राज्यांच्या चित्ररथांचाही समावेश आहे. तर 12 राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.
भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात साजरा होत आहे. सकाळी सव्वा दहा वाजता राजपथावर प्रजासत्ताक दिन सोहळा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान मोदी यांचं राजपथावर आगमन होईल. तर 10 वाजून 23 मिनिटांनी राष्ट्रपती राजपथावर पोहोचतील. सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजल्यापासून राजपथावर संचलन सुरू होणार आहे.
पार्श्वभूमी
73rd Republic Day : भारताचा आज 73 वा प्रजासत्ताक दिन आहे. देशभर जल्लोषाचे वातावरण आहे. राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेडही पाहायसा मिळणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी कोणते कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे, वाचा सविस्तर...
सर्वप्रथम, सकाळी 10.05 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख पंतप्रधान पंतप्रधानांसोबत उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर 10.15 वाजता पंतप्रधान राजपथवर पोहोचतील. त्यानंतर 10.18 वाजता राष्ट्रपती राजपथवर पोहोचतील. देशाच्या पहिली महिला म्हणजेच राष्ट्रपतीच्या पत्नी 10.21 मिनिटांनी राजपथवर पोहोचतील. ठीक 10.23 वाजता, राष्ट्रपती राम नाथ कोविंद त्यांच्या ताफ्यासह आणि राष्ट्रपतींच्या घोडेस्वार अंगरक्षकांसह राजपथवर पोहोचतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -