Maharashtra Politics बुलढाणा : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी काल, शनिवारी केलेल्या वक्तव्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण देत एकप्रकारे सावरासावर केली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील नागरी सत्कार कार्यक्रमात काल प्रतापराव जाधव यांनी भाषणादरम्यान आमच्या राज्य सरकारने आता शेतकऱ्यांचे शेतीच वीजबिल माफ केलं आहे, हे उपस्थितांना पटवून देताना मी ही शेतकरी आहे, आमच्या तीन पिढ्यांनी शेतीच वीज बिल भरले नसल्याचं म्हटलं होतं. 


मात्र, आज मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटल आहे की, मी राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने शेतीचे वीजबिल माफ केलं असून पुढील पाच वर्ष वीज मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांच्या भाषेत सांगत होतो. मात्र माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आणि मीच वीज बिल भरले नाही असं सांगितलं. मी स्वतः कधीच वीज बिल बुडवले नसून माझ्या सर्व शेतीच वीज बिल मी मार्च महिन्यात भरत असतो. वाटल्यास मी तुम्हाला नो ड्युज प्रमाणपत्र देऊ शकतो. अशी  स्पष्टोक्ती आता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.  


नेमकं काय म्हणाले होते मंत्री प्रतापराव जाधव?


मी शेतकरी आहे. माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचे वीज बिल भरले नाही, माझ्या आजोबांनी पण नाही , माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी देखील वीज बिल भरलेले नाही. किंबहुना विजेची डी.पी. जळाली तर संबंधित इंजिनियरला एक हजार रुपये दिले की झालं काम! असा अजब किस्सा शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी काल सागितला होता. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे दोन केंद्रीय मंत्र्याचा नागरी सत्कार करण्यात आला. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री प्रतापराव जाधव यांनी हा वक्तव्य केलं होते.   


जसं दोन सम विचारी बैल शेतीत जुंपले की शेती चांगली होते, तस सरकारच आहे. केंद्र आणि राज्य सरकार समविचारी असले की विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रत्येक खासदारांवर, प्रत्येक खात्यांवर बारीक लक्ष असतं. असेही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. असे असताना मात्र, मी मंत्री झाल्यावर आमचा सामान्य माणसाशी संपर्क कमी होतो आहे, याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली होती.  


इतर महत्वाच्या बातम्या