‘हे दोघेही आता उघडपणे भाजपला मदत करतील’
“आंबेडकर-ओवेसी अधिकृतपणे एकत्र आल्यामुळे जनतेच्या मनातील संभ्रम संपला. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण पडद्यामागून करीत होते. आता ते दोघे उघड उघड हातात हात घालून 2019 सालात भाजपास मदत करतील. त्या दोघांचे एकत्र येणे हे हिंदुस्थानच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत.”, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
“आंबेडकर-ओवेसींचा नवा तंबू”
तसेच, “आंबेडकर व ओवेसी यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवे होते, पण ‘वंचित बहुजन आघाडी’च्या नावाखाली आंबेडकर-ओवेसी यांनी नवा तंबू टाकला आहे. राज्यातील दलित आणि मुस्लिम मते एकत्र करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.”, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
“आठवले गट, गवई गट, कवाडे गट, कांबळे गट व स्वतः प्रकाश आंबेडकर यांचा वेगळा गट असे रिपब्लिकन पक्षाचे तुकडेताकडे झाले आहेत. या सर्व गटातटांना एकत्र आणून मोठा एल्गार करण्याची गरज असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या ओवेसीबरोबर हातमिळवणी केली हे दलित बांधवांना रुचेल काय?”, असा सवाल उपस्थित करत आंबेडकरी गटांच्या एकत्रित येण्याची अपेक्षाही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
'ठरवून टाकलेला डाव'
भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या युतीला ‘डाव’ असल्याचे म्हणत अग्रलेखात म्हटले आहे की, ““प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले आहे. दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत. 2019 च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे.”
दरम्यान, भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या युतीवर ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली असली, तरी या दोन्ही पक्षांकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर किंवा ओवेसी यावर काही बोलतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.