Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्राप्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निकाल दिला. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्याशिवाय त्यांनी कोणत्याही आमदारांना अपात्र केले नाही. यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली. पण सत्ताधारी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या निकालाचं स्वागत करण्यात आले. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही राहुल नार्वेकर यांचं स्वागत केले. त्याशिवाय त्यांनी योग्य निकाल दिल्याचेही ते म्हणाले. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री राहणार - 


माननीय अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निकाल अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा आहे. माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, आणि त्याला वैध ठरवलेला आहे. त्यामुळे आता आमचं सरकार पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे. आता कोणाच्या मनात शंका असल्याचे कारण नाही, हेच सरकार राहणार आहे. हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत. खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून, सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न प्रेफ केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फर्मेशन काढत हा घेतलेला निर्णय आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 



हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल - 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही.मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 


नेमका निकाल काय ?


महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन बुधवारी पार पडलं.  एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.