Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताबाबत (Shiv Sena MLA Disqualification) विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची उलट तपासणी झाली. ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांच्याकडून त्यांना प्रश्न विचारले गेले. भरत गोगावले यांनी अॅड. कामत यांच्या प्रश्नावर आपल्या स्टाईलने उत्तर दिले. गुवाहाटी बाबतच्या प्रश्नाला याआधी शिंदे गटाच्या आमदारांनी उलट तपासणीत थेट उत्तर दिले नाही. तिथे मात्र, भरत गोगावले यांनी स्पष्टपणे उत्तरे दिली.
आज, मंगळवारच्या कामकाजात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची उलट तपासणी झाली. ठाकरे गटाचे वकील अॅड. कामत यांनी विचारलेल्या काही प्रश्नांना थेट उत्तरे दिली तर काही प्रश्नानांना तिरकस उत्तरे दिली. त्यांच्या या उत्तराने सभागृहात हसू उमटले. त्यामुळे गंभीर असणारे वातावरण हलकं फुलकं झाले.
'त्या' प्रश्नांना भरत गोगावले थेट भिडले
उलट तपासणीत शिंदे गटाच्या आमदारांना गुवाहाटीला जाण्यासाठी प्रवास खर्च कोणी केला, हॉटेलचा खर्च कोणी केला, असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र, यावर थेट उत्तर देणे आमदारांनी टाळले. मात्र, भरत गोगावले यांनी गुवाहाटीच्या खर्चाबाबत थेट उत्तर दिले. अॅड. कामत यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी तुम्ही स्वतःची व्यक्तिगत तिकीट काढले होते का? की कुणी काढली होती असा प्रश्न विचारला. त्यावर भरत गोगावले यांनी आम्ही स्वतःच्या खर्चाने गेलो..कामाख्या देवीचे दर्शन स्वतःच्या पैशाने घेणे उचित आहे असे उत्तर दिले.
'या' कारणांसाठी सूरतला गेलो
आमदार भरत गोगावले यांना सूरतबाबतही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातून जाण्यासाठी सूरत का निवडले असा प्रश्न गोगावले यांना विचारण्यात आला. त्यावर गोगावले यांनी सूरत चांगले ठिकाण आहे, असे मी ऐकले होते. त्यामुळे तिकडे जाऊन आपण व्यक्तिश: बघावे, म्हणून मी सुरत हे ठिकाण निवडले असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने सभागृहात हास्य उमटले. काही प्रश्नानंतर गोगावले यांना सुरतमधील एकाच हॉटेलमध्ये सर्व आमदारांनी जमणे, हा योगायोग नव्हता; तर हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. हे बरोबर आहे का? असा प्रश्न केला. त्यावर गोगावले यांनी - ते मला माहित नाही. ते तिकडे कसे आले हे त्यांनाच माहीत असेल. शिवाजी महाराज तिकडे गेले होते, म्हणून मला वाटलं ते चांगलं ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो,असे उत्तर दिले.