MLA Disqualification Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटाचे 16 आममदारांबाबत अपात्र की पात्र याबाबतचा निकाल 10 जानेवारीला येणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अनेक आमदारांची धाकधूक वाढली आहे. उद्या काय होणार याकडे राजकीय वर्तुळासह आख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार रमेश बोरनारे यांचादेखील यात समावेश आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बोरनारे यांनी मतांच्या जोरावर आपली लोकप्रियता दाखवून दिली होती. कोण आहेत रमेश बोरनारे? आणि त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता?  जाणून घेऊया.


विकास कामांमुळे मतदारसंघात वजन


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये मराठवाड्यातील आमदारांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यातलंच महत्वाचं नाव म्हणजे आमदार रमेश बोरनारे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. सत्तेत राहून विकासकामांचा धडाका लावला. रमेश बोरनारे यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चांगली ओळख निर्माण केली. 


आर. एम. वाणींची शिफारस अन् बोरनारेंनी बाजी मारली


वैजापूर विधानसभा मतदारसंघ नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी आमदार आर एम वाणी या मतदारसंघाचे नेतृत्व करायचे. मात्र 2019 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. परंतु याच वेळी वाणी यांनी रमेश बोरनारे यांच्या नावाची शिफारस केली. त्यावेळी रमेश बोरनारे जिल्हा परिषद सदस्य होते. वाणी यांच्या शिफारशीनंतर बोरनारे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून माजी दिवंगत आमदार कैलास पाटील चिकटगावर यांचा मुलगा अभय पाटील चिकटगावकर रिंगणात होते. परंतु यावेळी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या बोरणाऱ्यांनी बाजी मारली.


बाळासाहेब ठाकरेंवरची निष्ठा अन् एकनाथ शिंदेंचा आदर्श 


यातील अनेक आमदारांनी बाळासाहेबांवरील निष्ठेपोटी शिंदे यांच्यासोबत बंडाचा झेंडा हाती घेतला. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेली निष्ठा अनेकांनी जपली आणि थेट शिंदे गटात सामील झाले. त्यात बोरनारेदेखील होते. बोरनारे यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा  मोठा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे लहान गावातून राजकारणात प्रवेश घेतानाच त्यांनी मोठं स्वप्न बघायला सुरुवात केली. बाळासाहेबांची कामाची पद्धत त्यांनी आकारली मतदारसंघात अगदी प्रत्येक बारीक सारीक विषयांवर त्यांनी वैयक्तिक लक्ष घातलं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी बंड केलं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत पाहून आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ देत आहेत. आता मात्र त्यांच्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे या निकालात नेमकं काय होतं?,  हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत काडीमोड घेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग झाला. दोन वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि पण जवळपास दोन वर्षानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यामुळे राज्यात मोठं सत्तानाट्य बघायला मिळालं. एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन ते सूरतमार्गे गुवाहाटीमध्ये पोहचले. यावेळी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. एकाचवेळी 40 आमदारांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली. त्यानंतर जे काही घडलेय ते सगळ्या देशानं पाहिलं. याच प्रकरणाचा निकाल लागणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


MLA Disqualification : मंत्री संदिपान भुमरेंचं काय होणार, आमदारकी जाणार की वाचणार?