Sudhir Joshi passed away : शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं गुरुवारी निधन झालं आहे. ते 81 वर्षाचे होते. शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांचा मोठा वाटा होता. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, सुधीर जोशी यांच्या जाण्याने आम्ही एक अनमोल हिरा गमावला आहे, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.
संजय राऊत म्हणाले, "सुधीर जोशी यांनी तरूण वयात मुंबईचे महापौरपद भूषवलं. मुंबईची प्रतिमा कशी असावी हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. शिवाय महापौर कसा असावा? याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुधीर जोशी होते. ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करायचे. सुधीर जोशी यांनी अनेक आंदोलनाचे नेतृत्त केले. सीमा लढ्यासाठीही त्यांनी अनेक आंदोलने केली. ते बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे सहकारी होते. राज्याचे सहकार आणि शिक्षण मंत्री म्हणून सुधीर जोशी यांनी काम केले. पण दुर्देवाने त्यांचा अपघात झाला आणि ते राजकारणापासून थोडे दूर राहिले. राजकारणापासून दूर असले तरी शिवसेनेसोबत त्यांचे नाते कायम होते. त्यांच्या जाण्याने शिवसेनेने एक अनमोल हिरा आणि आंदोलनातील तळपती तलवार आम्ही गमावली आहे. त्यांची आम्हाला कायम उणीव भासेल."
"सुधीर जोशी यांनी शिवसेनेचा चेहरा मोहरा बदलण्याचं महत्वाचं काम केलं. मराठी तरूणांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. सुधीर जोशी हे एक उत्तम वक्ते होते. शिवाय अफाट बुद्धिमत्ता लाभलेला हा नेता होता. सुधीर जोशींचे वाचन अफाट होतं. सुधीर जोशी आमच्या आणि प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात होते आणि यापुढेही ते हृदयात राहतील, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.
कोण होते सुधीर जोशी?
सुधीर जोशी यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून काम केलं. 1972 मध्ये सुधीर जोशी यांनी मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघाचे आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात मंत्री म्हणून सुधीर जोशी यांनी काम पाहिले आहे. सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. 1972-73 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले, तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. 1968 पासून सुधीर जोशी विधान परिषद सदस्य होते. 1992-93 या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते.
महत्वाच्या बातम्या
Sudhir Joshi passed away : शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Rohit Pawar : शरद पवारांनी रोहित पवारांना दिली मोठी जबाबदारी