Sudhir Joshi passed away : शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं गुरुवारी निधन झाले आहे. ते 81 वर्षाचे होते. शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांचा मोठा वाटा होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे विश्वासू म्हणून त्यांचीं ओळख होती.  शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.  सुधीर जोशी हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून परिचित होते. सुधीर जोशी शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. पहिल्या युतीच्या सरकारमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेटपदही भूषावले आहे. त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम काम पाहिले आहे.


जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली होती, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली.  बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. मागील काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालवली होती. त्यांना कोरोनाचा संसर्गही होऊन गेला होता.  सुधीर जोशी यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते.  त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा अस्थिर झाली होती. 


सुधीर जोशी यांनी मुंबई महापौर ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले आहे. 1999 मध्ये सुधीर जोशी यांनी आजारपणामुळे सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


 






सुधीर जोशी यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून काम केलं. 1972 मध्ये सुधीर जोशी यांनी मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघाचे आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात मंत्री म्हणून सुधीर जोशी यांनी काम पाहिले आहे. सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. 1972-73 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले, तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. 1968 पासून सुधीर जोशी विधान परिषद सदस्य होते. 1992-93 या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. युती सरकारात सुधीर जोशी जून 1995 ते मे 1996 या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर 1996 ते 1999 पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live