NCP MLA Rohit Pawar : नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी रोहित पवार यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. ही निवडणूक गाजवणाऱ्या रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनंतर प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जबाबदारी सोपवली आहे. भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आता रोहित पवार यांच्या खांद्यावर असणार आहे. 


रोहित पवार यांचे ट्विट -
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलेय की, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.


पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील 15 ते 17 महानगरपालिकाच्या निवडणूका पार पडत आहेत. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूका लागणार आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी अद्याप वेळ असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. त्यासाठीच भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे दिली आहे. रोहित पवार तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कर्ज जामखेड मतदार संघामध्ये रोहित पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळेच रोहित पवाल यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याचा अंदाज आहे.