मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. काँग्रेसचं एकला चलो रे चा नारा असो, म्हाडाच्या सदनिकांबाबतचा निर्णय मागे घेणे असो किंवा इतर मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, महाविकासआघाडीचं असो किंवा अटलजींसारखं 32 पक्षांचं असो, कामाच्या पद्धतीवरून लोकांमध्ये मतभेद असू शकतात. म्हणून कुणी नाराज आहे असा समज करु नये. एखाद्या विषयावर वेगळी मतं असू शकतात. यासाठी कॅबिनेटची बैठक बोलावली जाते त्यात निर्णय घेतले जातात. नाराजीबाबत जी चर्चा सुरुये त्यात काही अर्थ नाही, असं ते म्हणाले.


विरोधी पक्षाला हवं आहे तसं काही घडत नाहीये. त्यामुळे त्यांचा नाराज शब्दावर जास्त जोर आहे. कोरोनाचं संकटामुळे मोठ्या योजना पुढे नेता आल्या नाही. मात्र आता हळूहळू कामाला आणि सरकारला गती मिळते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळा पूर्ण करेल यात शंका नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. 


देवेंद्र फडणवीस जेव्हा संन्यास घेण्याची भाषा करतात, तेव्हा ते त्या पक्षाचं वैफल्य आहे. राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या नेत्याने राज्य सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं तर राज्याची जनता त्यांना दुवा देईल. अनेक प्रश्नांमध्ये विरोधी पक्षांनी फक्त विरोधासाठी टांग टाकायची गरज नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं.