पंढरपूर : वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने 10 मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. मात्र, आषाढी वारी भरण्यापूर्वी पंढरपूर मधील नागरिकांचे लसीकरण करून घ्या आणि मगच वारी भरवा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.


यंदा या दहा मानाच्या पालखी सोहळ्यासोबत प्रत्येकी 40 अशा 4 हजार वारकऱ्यांना परवानगी दिली गेली आहे. यांच्या सुरक्षेसह इतर व्यवस्थापनासाठी किमान अडीच ते 3 हजार पोलीस व इतर विभागाचे अधिकारी अधिकृतपणे पंढरपूरमध्ये येणार आहेत. याशिवाय आषाढी वारीसाठी घुसखोरी करून प्रवेश मिळवणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असणार आहे. 
      
यामुळे अजूनही कोरोनाचा धोका कायम असलेल्या पंढरपूर शहरातील लसीकरणाची अवस्था मात्र दयनीय आहे. सव्वा लाखाच्या शहरात केवळ 18 ते 19 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एवढ्या मोठ्या शहरात आठवड्याला केवळ दीडशे ते दोनशे एवढाच लसींचा साठा मिळत असल्याने लसीकरण व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला आहे. यातही गेल्या 23 जूननंतर पंढरपुरात लस आली नसल्याने शेकडो नागरिक लसींची वाट पाहत लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर शहराची अवस्था गंभीर बनली होती. अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती कायम आहे. 


अशावेळी पुन्हा आषाढी वारीला वारकरी येणार असल्याने आधी लसीकरण करा आणि मगच वारी भरावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. आम्ही विकत लस घेण्यास तयार आहोत, शहरात 14 केंद्रांना परवानगी दिली तर त्यांना लसी पुरवल्यास आम्ही पैसे देऊन लसीकरण करून घेऊ अशी भूमिका शहरातील व्यापारी घेत आहेत. शहरातील नागरिकांचे  लसीकरण गेल्या 7 दिवसापासून बंद असताना आज मात्र पालखी प्रस्थानासाठी परवानगी दिलेल्या वारकरी महाराजांची तपासणी करून लसीकरण करण्यात आले आहे. आता शासनाला वारी भरवायची असेल तर रोज किमान एक हजार लसी शहरातील नागरिकांना देऊन लसीकरणाला यात्रेपूर्वी वेग आणावा अशी मागणी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे. अन्यथा जो फटका निवडणुकीचा बसला तशीच मनुष्यहानी आषाढीनंतर होऊ नये हीच अपेक्षा पंढरपूरचे नागरिक करीत आहेत.


किमान बसने जाणाऱ्या पालख्यांची संख्या तरी वाढवावी..


सरकार जे काही निर्देश देईल त्या सगळ्याचं पालन करायला वारकरी तयार आहेत. वारकरी हा शिस्तबद्धच असतो तो कधी धुडगुस घालत नाही. निवडणुकीसारखे अनेक राजकीय कार्यक्रम होतात मग वारीला अटकाव का? असा प्रश्ना आषाढी वारीसाठी पायी पालख्यांना परवानगी द्यावी याबाबत याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी उपस्थित केला आहे. अडीचशे नोंदणीकृत पालख्या असताना केवळ मानाच्या दहा पालख्या का निवडल्या. सर्वांच्या प्रतिनिधित्वाचा विचार का केला नाही. पहिली मागणी आमची पायी वारीला परवानगीची आहे, ती मान्य झाली नाही तर किमान बसने जाणाऱ्या पालख्यांची संख्या तरी वाढवावी ही विनंती कोर्टाकडे करू, असे ते म्हणाले. पुढच्या दोन-तीन दिवसात ही याचिका सुनावणीस येईल अशी आशा आहे, असे ते म्हणाले.