Gulabrao Patil :  शिवसेना नेते (Shiv Sena) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी यापूर्वी रस्त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. परंतु, त्यांनी आता परत असेच वक्तव्य केले आहे. 


"रस्त्यांबाबत अभिनेत्रीचे नाव घेऊन चुकीचं बोलून गेलो होतो. त्यामुळे आता तो गाल सोडला आणि ओम पुरींचा गाल पकडला. ओम पुरींच्या गालावर कोणी टीका करू नये, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. भुसावळ येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते.   


गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी, आपल्या मतदारसंघात आपण खूप चांगले रस्ते केले आहेत, हे सांगताना रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली होती. त्यानंतर आज त्यांनी ओम पुरी यांच्या गालाला रस्त्याची उपमा दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, "खराब रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न असल्याचा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. कुणाचेही मन दुखवण्याचा माझा हेतू नाही. परंतु, मागच्या भाषणावेळी माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला, ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे." अशी प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर सारवा सारव केली.


गुलाबराव पाटील म्हणाले, निवडणुका आल्या की मतदार सकाळी शिवसेनेचे मटण खातात, दुपारी भाजपची शेव भाजी खातात आणि रात्री काँग्रेसचं जेवण करतात. वरुन सर्वांशी संबंध असल्याचे सांगत कुणाचं मटण खातात आणि कोणाचं बटण दाबतात ते समजत नाही, असेही वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले आहे.   


गुलाबराव पाटील यापूर्वी काय म्हणाले होते?


"गेली 30 वर्षे एकनाथ एकनाथ खडसे या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केले आहेत", असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यामुळं त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली होती. 


महत्वाच्या बातम्या


Gulabrao Patil Apologized: 'गुलाबी गालांबद्दलचं 'ते' वक्तव्य भोवलं, गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी


लायसेन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली : गुलाबराव पाटील


Rahul Bajaj Passes Away : बजाज चेतक बनली होती प्रत्येक घराची शान, राहुल बजाज यांनी तयार केली होती खास स्कूटर