बुलढाणा : औरंगाबादनंतर बुलढाण्यातील आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांच्या सभेला देखील पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाले आहेत.  सभेला परवानगी नाकारणे म्हणजे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासह जनतेचा आवाज दाबण्याचा प्रकार सुरू आहे. पोलिसांना शिवसैनिकांशी संघर्ष करायचा असेल तर आम्ही तयार आहोत, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय. 


आदित्य ठाकरे यांच्या बुलढाणा येथील सभास्थळाला परवानगी नाकारल्यानंतर बादास दानवे यांनी बुलढाण्यातील पोलिसांना इशारा दिलाय. "एखाद्या आमदाराच्या कार्यालयाच्या बाजूला किंवा कुठे सहभाग घेणे न घेणे हा पोलिसांना अधिकार नाही. सभा ही राजकीय असते, आमचा राजकीय बेल्ट असतो त्यानुसार राजकीय पक्ष सभा घेत असतात. त्यामुळे पोलिस जर दडपशाही वापरत असतील आणि पोलिसांना जर शिवसैनिकांची संघर्ष करायचा असेल तर आम्ही तयार आहोत. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा कुणीही अडवू शकत नाही. सभा अडवणे हे लोकशाहीला घातक आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 


येत्या 7 नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर येणार आहेत. बुलढाणा आणि मेहकर येथे त्यांची सभा होणार असल्याने सभेसाठी बुलढाणा तालुका शिवसेना प्रमुख लखन गाढेकर यांनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दिला होता. मात्र पोलिसांनी नियोजित स्थळी म्हणजे बुलढाण्यातील गांधी भवनातील सभेला परवानगी नाकारली आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकानाहून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं संपर्क कार्यालय जवळ असल्याने कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी बुलढाण्यातील आदित्य ठाकरे यांच्या सभास्थळाला परवानगी नाकारली आहे.


दरम्यान,  आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर बुलढाण्यातील शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. सभा त्याच ठिकाणी होईल अशा इशारा शिवसेना नेत्यांनी प्रशासनाला दिलाय. "आम्ही सभा त्याच ठिकाणी घेणार आहोत. ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणीच सभा होईल. सभेत जर आम्ही काही चुकीचं बोललो तर ती जबाबदारी आमची आहे. सध्या आम्हाला राज्यातील शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे आम्ही या सभा घेत आहोत. जर प्रशासनाने आम्हाला परवानगी नाकारली तर भविष्यात राज्यातील आमदारही फिरणार आहेत असा इशारा  बुलढाणा शिवसेनेचे संपर्कप्रमुख छगन मेहेत्रे यांनी दिला आहे.


महत्वाच्या बातम्या


मी दहशतवादी आहे का? माझ्या कारपुढे 500 पोलिसांचा गराडा; सभेला परवानगी नाकारल्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक