Dasara Melava 2022 :  हायकोर्टाच्या निकालानंतर शिवाजीपार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झाले. हायकोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी राज्यभर आनंदोत्सव साजरा केला. मुंबई, नाशिक आणि कोल्हापूरसह राज्यभरातील शिवसैनिकांनी जल्लोषात कोर्टाच्या निकालाचं स्वागत केलं. ढोल ताशाच्या गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला. हायकोर्टाच्या निर्णायानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाकडून कोर्टाचा निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. तर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली. त्याशिवाय भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात कोण काय म्हणाले....


शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग, सचिन सावंत यांचा निशाणा -
शिवसेनेला दसरा मेळाव्याला उच्च न्यायालयाकडून मिळालेली परवानगी शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग आहे. शासन द्वेष, तिरस्कार आणि सूडाने करायचे नसते हा धडा यातून ते शिकले तर त्यांच्यासाठीच बरे होईल, असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी निशाणा साधला. 


रोहित पवार काय म्हणाले?
कोर्टाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परंपरा अबाधित राहिली! सर्व निष्ठावान शिवसैनिकांचे अभिनंदन!, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. त्याशिवाय या पोस्टसोबत रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही पोस्ट केलाय. 


आदित्य ठाकरेंवर नितेश राणेंचा निशाणा -
हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोष केला. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत टीकास्त्र केले. फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना ?? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. 


कोणी इकडे घ्या, कोणी तिकडे जा - भुजबळ  


आता प्रश्न मिटला आहे. उद्धव ठाकरे आणि सगळ्यांचा आग्रह होता परवानगी मिळायला पाहिजे. शेवटी त्यांना ते मिळालं. बिकेसी ग्राउंडपण मोठं आहे. कोणी इकडे घ्या, कोणी तिकडे जा... अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. 
निशाणीचा विषय समजू शकतो. पण सभेच्या जागेसाठी भांडण असायचं कारण नाही. जो पर्यंत मी सेनेत होतो तोपर्यंत शिवतीर्थावर मी देखील भाषण करायचो. सुप्रीम कोर्टात वेळ घालवण्यापेक्षा तुमचा वेळ शक्ती दाखवायला घाला. शेवटी मीडियावरून सगळं महाराष्ट्र बघणार आहे, असेही भुजबळ म्हणाले. 


आमच्या त्यांना शुभेच्छा - देवेंद्र फडणवीस
कोर्टाचा निर्णय आहे. कोर्टाने सांगितले त्याप्रमाणे प्रशासन नियम पाळेल. गृह विभाग कायदा आणि सुव्यवस्था पाळणार आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  


माझ्या मनासारखं झालं - दादा भुसे
 आपण लोकशाही मानणारे आहोत आणि  व्यक्तिगत विचारलं तर माझ्या मनासारखं झालं. शिवाजी पार्कची मर्यादा 50 हजारांची आहे, असे म्हणत दादा भुसे यांनी टोमणा लगावला. पुढे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की,  आज आपल्याला जो उस्तूर्फ प्रतिसाद मिळतोय, त्यापेक्षाही  चारपटी ने मैदान लागेलं. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुंबईतील सगळ्यात मोठ्या मैदानात मेळावा घेवू. मुंबईत नसेल ठाण्याला पाहू ठाण्यात नसेल तर मी नाशिकला पाहतो, असे दादा भुसे म्हणाले. 


कोर्टाचा निर्णय मान्य, आम्ही बीकेसीवर दसरा मेळावा घेऊ - भरत गोगावले
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी हायकोर्टानं दिलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याशिवाय आम्ही आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेऊ, ते त्यांचा दसरा मेळावा घेतील, असेही गोगावले म्हणाले. कोर्टानं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. शिवाजी पार्कसाठी ते कोर्टात गेले होते, आम्हाला कोर्टानं दिलेला निकाल मान्य आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होईल. आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. आमचा कार्यक्रम होईल, त्यांचा ते करतील, अशी प्रतिक्रिया  शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिली. 


दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल : विनायक राऊत 
न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात देखील शिवसेनेच्या बाजूने निकाल लागेल. आमची न्यायाची बाजू आहे. आमच्याकडे कोणतीही खोट नाही. आम्ही प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेतो. येवळी देखील ही दक्षता देण्यात येईल आणि दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. 


हा कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय - चंद्रकांत खैरे
हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे अतिशय भावूक झाले होते, यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. हा राज्यभरातील कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय असल्याचं वक्तव्य यावेळी त्यांनी केलं आहे. आई जगदंबेच्या कृपेने हा न्याय मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह कोट्यवधी शिवसैनिकांचा हा विजय आहे. मी सकाळपासूनच खूप चिंतेत होतो. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खूप छळलं, न्याय दिला नाही, परंतू न्यायपालिकेनं अखेर न्याय दिला. यातून परमेश्वराकडं न्याय आहे, हे ही दिसून आलं, असे खैरे म्हणाले. 




अतुल भातखळकर काय म्हणाले?
मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाला जे योग्य वाटलं तो त्यांनी दिला मी यावर बोलणार नाही. मुंबई महानगर पालिकेचे प्रशासन कारभार म्हणून काम करते. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल म्हणून पालिकेने ते मत मांडले. कायदा सुव्यवस्था हातळली जाईल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस उत्तर देतील, असे अतुल भातखळकर म्हणाले. 


शिवसेनेची परंपरा जिंकली - किशोरी पेडणेकर 
शिवसेनेची परंपरा जिंकली, अशी प्रतिक्रिया हायकोर्टाच्या निकालानंतर किशोरी पेडणेकर यांनी दिली. बाळासाहेबांचे विचार जिंकले! उद्धव साहेबांचा निर्धार जिंकला! शिवसेनेची परंपरा जिंकली! दसरा मेळावा शिवतीर्थावरच! असे ट्वीट किशोरी पेडणेकर यांनी केलेय.