मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आला आहे. विधानपरिषदेसाठी भावना गवळी (Bhavana Gawali) आणि कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपने त्यांच्या पाच नावांची घोषणा केल्यानंतर आता शिंदे गटाकडूनही दोन नावांची घोषणा करण्यात आली. शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. भावना गवळी या पाच वेळेच्या खासदार असून त्यांना यावेळच्या लोकसभेसाठी तिकीट नाकारलं होतं. तर कृपाल तुमाने रामटेकमधून दोन वेळा निवडून आलेले होते. त्यांनाही तिकीट नाकारून त्या ठिकाणी भाजपच्या राजू पारवे यांना संधी देण्यात आली होती.
भावना गवळी यांना संधी दिल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत यवतमाळ आणि वाशिम सह आजूबाजूच्या परिसरात शिंदे गटाला फायदा होणार असल्याची चर्चा आहे.
तिकीट कापलेल्या खासदारांना संधी
कृपाल तुमाने हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळचे खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी कापली होती. त्या ठिकाणी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. रामटेकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. पण तिकीट कापलेल्या कृपाल तुमाने यांना एकनाथ शिंदेंनी आता विधानपरिषदेची संधी दिली आहे.
तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी या यावेळीही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होत्या. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा असताना भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे त्याचं तिकीट कापण्यात आलं आणि ते हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं. या ठिकाणीही महायुतीच्या उमेदवारला पराभवाचा धक्का बसला आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?
पंकजा मुंडे
योगेश टिळेकर
परिणय फुके
अमित गोरखे
सदाभाऊ खोत
ही बातमी वाचा: