सातारा: खासदार उदयनराजे जेवढे बेधडक तेवढेच मनाने हळवे आहेत आणि त्याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या आठवणीने उदयनराजे भारावले. शिवरायांची महती सांगताना उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्या काळात जन्माला आलो असतो तर मावळा म्हणून धन्य झालो असतो, हॅट्स ऑफ टू यू असं ते म्हणाले. 


खासदार उदयनराजेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते शिवाजी महाराजांच्या विषयी बोलताना म्हणतात की, आतापर्यंत एवढे मोठ मोठे नेते बघितले, मात्र 300 वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांच्या या जयंतीचा जल्लोष पाहून मन भरून येतं. इथं माणूस गेल्यानंतर, तिसरा दिवस झाला तर लोक विसरतात, दहावा-तेरावा तर लांबच. पण शिवरायांना आजही तेवढ्याच आदराने पूजलं जातं. 


या कुटुंबात जन्म हे माझे भाग्य
खासदार उदयनराजे म्हणाले की, "शिवरायांनी कधीच भेदभाव केला नाही. लोकशाहीचा पाया त्यावेळी छत्रपती शिवरायांनी तयार केला. लोकांचा सहभाग असल्याशिवाय ते शक्य नाही. शिवाजी महाराजांमध्ये आणि इतर सत्ताधीशांमध्ये एवढाच फरक होता की ते इतर लोक त्यांची जहागीर वाढण्यासाठी प्रयत्न करत होते आणि शिवाजी महाराज लोकांसाठी लढत होते. आजही त्यांची प्रतिमा ही देवाऱ्यात पूजली जाते. ते लढले ते सर्व सामान्य जनतेसाठी आणि अशा कटुंबात मी जन्माला आलो हे मी माझे स्वत:चे भाग्य समजतो."


मी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझे काम करतोय असं सांगत उदयनराजे म्हणाले की, "शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते आणि ते म्हटलंच पाहिजेत.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मॉर्डन इंडियाचे त्यावेळचे आर्किटेक्ट हॅटस ऑफ टू यू, ग्रेट पर्सनॅलिटी!"


महत्त्वाच्या बातम्या: