जळगाव: ज्या भारतीय जनता पक्षात चाळीस वर्षे हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं, त्या पक्षाने मुख्यमंत्रीपदाची वेळ आल्यावर देवेंद्र फडणवीसांना डोक्यावर बसवलं अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी आपली खदखद व्यक्त केली. नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदापर्यंत आला, पण त्यावेळी नावच वगळण्यात आल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे रेशन कार्ड वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.


एकनाथ खडसे म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीमध्ये चाळीस वर्ष हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी घातलं. त्याच पक्षात नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि नाथाभाऊचं नाव  वगळण्यात आलं. आपल्यावर अन्याय करण्यात आला."


यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "मी मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्रीपदापासून डावलण्यात आलं."


एकनाथ खडसे म्हणाले की, "मुख्यमंत्री पदाचा अधिकार हा खान्देशाचा होता. स्वातंत्र्याला 70 वर्ष होऊन गेली, मात्र खान्देशावर सतत अन्याय करण्यात आला. गेल्या 70 वर्षात कोकणात नारायण राणे , मनोहर जोशी, बॅ. अंतुले असे तीन-तीन मुख्यमंत्री झाले. विदर्भात या आधी चार मुख्यमंत्री झाले आणि पाचवे देंवेंद्र झाले. मराठवाड्यातील  विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत. मात्र नाशिक, नगर,जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर अधिकार असतानाही गेल्या सत्तर वर्षात एकदाही संधी देण्यात आली नाही. चाळीस-चाळीस वर्षे पक्षात आम्ही हमाली केली, पक्ष मोठा केला. देवेंद्र फडणवीसांसारख्यांना आम्ही घडवलं. मात्र आमचा अधिकार असतानाही मुख्यमंत्री पदापासून डावलण्यात आलं, सातत्याने अपमानित करण्यात आलं."


महत्त्वाच्या बातम्या: