अहमदनगर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या 75 कोटी सूर्यनमस्कार उपक्रमाने नवा विश्व किर्तिमान प्रस्थापित केला आहे. जवळपास दिड महिना चाललेल्या या उपक्रमात भारतासह जगभरातील 176 देशांमधून 57 लाख योगसाधकांसह सुमारे सव्वा लाख संस्थांनी सहभाग घेत 114 कोटी सूर्यनमस्कार घातले. जगभरात इतक्या विस्तृत प्रमाणात आयोजित झालेल्या अशा दुर्मीळ उपक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह ऑलिंपीया बुक ऑफ रेकॉर्डस् व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झालीय.
     
पतंजली योगपीठ, गीता परिवार, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन, क्रीडा भारती व हार्टफूलनेस इन्स्टिट्यूट या संस्थांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन केले होते. 1 जानेवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत जगभरात राबविल्या गेलेल्या या उप्रकमात 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र ठरलेल्या कालावधीपूर्वीच हा आकडा पूर्ण झाला आणि 20 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 114 कोटी सूर्यनमस्कारांची नोंद झाली. या जागतिक पातळीवरील उपक्रमात 176 देशातील 57 लाखांहून अधिक योगसाधकांसह 1 लाख 24 हजार 485 सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या असल्याची माहिती गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा या उपक्रमाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प संयोजक डॉ.संजय मालपाणी यांनी दिलीय


या कालावधीत आयोजकांना जगभरातून 4 लाख 39 हजार 551 योगासनांची वेगवेगळी छायाचित्रे प्राप्त झाली, त्यालाही गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारा जगातील सर्वात मोठा ऑनलाईन योग फोटो अल्बम म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या योग शिबिरात गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) व ऑलिंपीया रेकॉर्डस् (कॅनडा) या संस्थांनी सूर्यनमस्कारांच्या विश्वविक्रमाचे प्रशस्तिपत्रक योगर्षी स्वामी रामदेव महाराज, गीता परिवाराचे संस्थापक स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज, उपक्रमाचे प्रकल्प अध्यक्ष डॉ.जयदीप आर्य, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा या उपक्रमाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प संयोजक डॉ.संजय मालपाणी आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.


महत्त्वाच्या बातम्या: