चंद्रपूर :  राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा (Heat Wave)  कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही असे चित्र दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र स्वरूपाची लाट असल्याचं पाहायला मिळत असून आज 45.4 इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे.


गेल्या पंधरा दिवसापासून   विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट पसरली आहे.  मात्र गेल्या दोन दिवसात ही लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचं टाळले.  काल (20 एप्रिल)  जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही  महाराष्ट्रातल्या तीन शहरांमध्ये झाली आहे. ब्रह्मपुरीत 45.3,  चंद्रपुरात 45.2 अंश सेल्सिअस तापमान तर अकोल्यातही  44.9  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


गेल्या पंधरा दिवसापासून चंद्रपूर जिल्हयात उष्णतेची लाट पसरली आहे. मात्र गेल्या दोन दिवसात ही लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचं टाळले.  एरवी भर दुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ज्या नागरिकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे ते नागरिक उन्हापासून बचाव करणाऱ्या उपाययोजना करून बाहेर पडत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी काहींनी शीतपेय तर काहींनी उसाचा रस  पिण्यासाठी गर्दी केल्याचं दिसत आहे.


वाढत्या उन्हामुळे उष्मा घाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. सध्या असलेले उन्हाची लाट अजून काही दिवस अशीच कायम राहिली तर अजूनही उष्मा घाताचे बळी वाढू शकणार असल्याची शक्यता आहे.  एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार असा विचार करून लोकांची चिंता वाढली आहे. मात्र डॉक्टरांनी याबाबत लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.  उन्हात बाहेर निघण्याचं टाळावे, शरीराला पाण्याची कमी होऊ देऊ नये, खूप पाणी प्यावे, त्यासाठी ज्यूस, नारळपाणी, ताक यासारखे पदार्थ घ्यावे.