शिर्डी : साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेला साईपादुका दर्शन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा पादुका दर्शन सोहळा नसून विश्वस्तांची फॅमिली ट्रीप असल्याचा आरोपही शिर्डीतल्या ग्रामस्थांनी केला आहे.
शिर्डीतील ग्रामस्थांच्या विरोधानंतर संस्थानानं पुढच्या महिन्यात अमेरिकेत होणारा साईपादुका दर्शन सोहळा रद्द केला आहे. शिर्डीत साई संस्थान विश्वस्तांची बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी विश्वस्तांना चांगलंच धारेवर धरलं.
साईपादुका देश-विदेशात नेण्यापेक्षा साईभक्त शिर्डीत कसे येतील, त्यांना राहण्यासाठी अधिक सोयी कशा मिळतील, याकडे लक्ष द्या, असं यावेळी विश्वस्तांना बजावण्यात आलं.
हा पादुका दर्शन सोहळा नसून विश्वस्तांची फॅमिली ट्रीप असल्याचा आरोपही शिर्डीतल्या ग्रामस्थांनी केला. या सोहळ्याच्या नावाखाली आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला.