शिर्डी/नागपूर: 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे, काळा पैसा असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहे. गैर मार्गाने कमावलेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकजण विविध मार्गांचा अवलंब करत आहेत.त्यातच अनेकांनी मंदिराच्या दानपेटीकडेही मोर्चा वळवला आहे.


कारण गेल्या काही दिवसात शिर्डीच्या साई मंदिरासोबत नागपूरच्या प्रसिद्ध साई मंदिरात कोट्यवधींचे दान 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात जमा झाले आहे.

गेल्या तीन दिवसांत शिर्डीतील साई मंदिरात जवळपास दीड कोटी रुपयांचं दान जमा झालं आहे. त्यापैकी 1 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम ही 500 आणि 1000 च्या नोटांची आहे. साईबाबांच्या दान पेटीत 1000 च्या 5500, तर 500 च्या 11 हजार नोटा जमा झाल्या आहेत.

तर दुसरीकडे नागपूरच्या प्रसिद्ध साई मंदिरातही असेच चित्र पाहायला मिळत आहे. वास्तविक, नागपूरच्या साई मंदिर प्रशासनाने देणग्यांसाठी कार्ड पेमेंटचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यामाध्यमातून दोन दिवसापूर्वीपर्यंत साई मंदिराला कार्ड पेमेंटच्या माध्यमातून एखाद दुसराच व्यक्ती देणगी द्यायचा. मात्र, पंतप्रधानांच्या ऐतिहासिक घोषणेनंतर, कार्डनं देणगी देण्यासाठी रांग लागली आहे. याशिवाय मंदिर व्यवस्थापनाचा विरोध झुगारुन मोठ्या नोटा बाळगणारे दान पेटीत आपला खिसा खाली करत आहेत.

त्यामुळे 500 आणि 1000च्या नोटांच्या भक्तांच्या दातृत्वामुळे देवस्थानांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.