मुंबई : गुरुनानक जयंती निमित्त देशभरातील बँकांना आज सुट्टी आहे. त्यामुळे आज फक्त एटीएममधून नागरिकांना पैसे काढता येणार आहेत. नोटाबंदीनंतर ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार-रविवार बँका सुरु ठेवण्यात आल्या होत्या.

सुट्टी असूनही सरकारी कार्यालयातील पेमेंट काऊंटर सुरु राहणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना सरकारी कार्यालयात वेगवेगळ्या बिलांचं पेमेंट करता येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून रक्कम काढण्यावर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसाला 4 हजारांऐवजी साडेचार हजार रुपयांची रक्कम बदलता येणार आहे.

सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!


एटीएममधून दोन हजारांऐवजी अडीच हजारांची रक्कम काढता येणार आहे. याशिवाय इतर बँक व्यवहारांवर लादण्यात आलेली मर्यादा देखील शिथील करण्यात आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना आदेश दिले असून, आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश


चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत राज्यातील सर्व रुग्णालयांना रुग्णांकडून चेक स्वीकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे.

रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून सहकार्य न मिळाल्यास 108 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर रुग्णाने दहा हजार रुपयांपर्यंतचा दिलेला चेक बाऊन्स झाल्यास त्या चेकची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे.

अर्थमंत्रालयाचे बँकांना नवे आदेश :

  • व्यवसायिक कारणासाठी बँक खात्यातून दिवसाला 2,500 रुपये काढण्याची मुभा



  • बँक खात्यातून दिवसाला 4 हजाराऐवजी 4,500 रुपयांच्या नोटा बदलता येणार



  • एटीएममधून दिवसाला 2 हजाराऐवजी 2,500 रुपये काढता येणार



  • दिवसाला बँक खात्यातून 10 हजार रुपये काढण्याचे निर्बंध हटवले



  • एका आठवड्यात बँक खात्यातून 20 हजाराऐवजी 24 हजार रुपये काढता येणार



  • पेन्शनर्ससाठीची वार्षिक प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत वाढवली


8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिसेंबरची मुदत दिली आहे.